पीएम केअर फंडातील खराब व्हेंटिलेटर्सची चौकशी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:02 AM2021-05-24T04:02:01+5:302021-05-24T04:02:01+5:30
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याचे आणि आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचे समोर येऊन दोन आठवडे उलटूनही ...
औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्याचे आणि आयसीयूत वापरण्यायोग्य नसल्याचे समोर येऊन दोन आठवडे उलटूनही त्यासंदर्भात कोणतीही चौकशीच होत नसल्याची स्थिती आहे. हे व्हेंटिलेटर केवळ दुरुस्त करण्याचा खटाटोप सुरू आहे. घाटीपाठोपाठ आता खाजगी रुग्णालयांना दिलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे व्हेंटिलेटर परत पाठविण्याऐवजी कसेही करून हे व्हेंटिलेटर रुग्णांच्या माथी मारण्यावरच भर दिला जात आहे. पीएम केअर फंडातून घाटीला प्राप्त झालेल्या १५० व्हेंटिलेटरची अवस्था ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून समोर आणली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. लोकप्रतिनिधींनीही या वृत्तांची गंभीरतेने दखल घेत घाटीत पाहणी केली. तेव्हा व्हेंटिलेटरची अवस्था त्यांच्याही निदर्शनास आली. घाटीला मिळालेल्या १५० पैकी काही व्हेंटिलेटर्स परभणी, हिंगोली येथे देण्यात आले. तेथेही हे व्हेंटिलेटर पडूनच आहेत. पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर रुग्णांना वापरण्यायोग्य आहेत की नाही, यासंदर्भात राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करावी, हे व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नसतील ते परत करावेत, अशी मागणी आ. सतीश चव्हाण यांनी केली आहे.
घाटी रुग्णालयात मात्र, अद्यापही या व्हेंटिलेटरच्या ना चौकशीसाठी, ना ऑडिटसाठी कोणी आले. या सगळ्यात एका रुग्णालयाने घाटीला काही व्हेंटिलेटर परत केले. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे कंपनीचे इंजिनिअर्स शहरात तळ ठोकून असून, घाटीत व्हेंटिलेटर दुरुस्त आणि अपग्रेड करण्यासाठी घाम गाळत आहेत. एका खाजगी रुग्णालयाला ३ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर घेतल्यापासून ते विनावापर पडून आहेत. हे व्हेंटिलेटर तपासण्यासाठी रविवारी या रुग्णालयात इंजिनिअर्स पोहोचले. त्यांच्याकडून येथील व्हेंटिलेटर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
व्हेंटिलेटर परत घेऊन जावे, नवे मिळावे
आपल्यासाठी हे व्हेंटिलेटर भंगार आहेत. आताच्या परिस्थितीत व्हेंटिलेटर गरजेचे आहेत. नंतर व्हेंटिलेटर येऊन उपयोग होणार नाही. चौकशीत जे समोर येईल ते येईलच; पण त्याला किती दिवस लागतील, हा प्रश्न आहे. सध्या ही प्राथमिकता आहे की, हे व्हेंटिलेटर परत घेऊन जाऊन चांगले व्हेंटिलेटर दिले पाहिजे. त्या व्हेंटिलेटरची संख्या कमी असली तरी चालेल.
- खा. इम्तियाज जलील