स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 05:20 PM2019-08-16T17:20:38+5:302019-08-16T17:24:43+5:30

विद्यार्थी, शेतकरी,  शिक्षकवृंदांची कसरत

There is no road to Kesapuri village since independence | स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

स्वातंत्र्यापासून केसापुरी गावाला रस्ताच नाही; ग्रामस्थांना निवडणुकीतच होते बसचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे३ किलोमीटर पायपीटकेवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या बसचे होते दर्शन

- संतोष वाघ । 
चितेगाव (औरंगाबाद ) : चितेगावपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या केसापुरीला देश स्वतंत्र झाल्यापासून डांबरी रस्ताच तयार केलेला नाही. लोकप्रतिनिधी १० वर्षांतून एकदा दगड-माती टाकून कसाबसा रस्ता तयार करतात. पावसाळ्यातील ४ महिने गुडघ्यापर्यंत चिखल तुडवीत या रस्त्यातून वाट काढावी लागते.

पैठण तालुक्यातील केसापुरी गावात रस्ताच नाही. बाभूळगाव ते केसापुरी हा ३ किलोमीटरचा रस्ताही दलदलीचा झाल्याने शेतकरी, दूध विक्रेते व विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाणे-येणे करणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते.  मागील ७१ वर्षांत या गावात डांबरी रस्ता कधी तयारच झाला नाही. या गावाची दळणवळण व्यवस्था  कोलमडलेली आहे. या गावच्या ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी खाजगी वाहनही उपलब्ध होऊ शकत नाही. केवळ निवडणुकीच्या वेळीच मतदान यंत्र घेऊन येणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसचे दर्शन गावकऱ्यांना होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत केसापुरी या गावाची निवड होऊनही रस्ताच नसल्याने गावाचे परिवर्तन होणार कसे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. या पंचवार्षिकपासून चितेगाव हा जिल्हा परिषद गट नव्याने उदयास आला. याठिकाणी निवडून येणारा जि.प. सदस्य हा केसापुरी गावाच्या रस्त्याचा प्रश्न मिटवील म्हणून गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु निवडणुका होऊन २ वर्षे उलटली तरीही या रस्त्याकडे सदस्याचे साधे लक्षही गेले नसल्यामुळे ३ किलोमीटर चिखल तुडवावा लागतो. 

केसापुरी या गावाला बाजारपेठ नसल्याने येथील लोकांना चितेगाव येथे नेहमी यावे लागते. गावात कोणतेही रुग्णालय नाही. जिल्हा परिषदेची शाळा पाचवीपर्यंत असल्याने पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना चितेगाव येथे यावे लागते. तीन किलोमीटर चिखलातून जाणे-येणे करण्यासाठी विद्यार्थी कंटाळून जात असल्याने चार महिन्यांत शाळेला निम्म्या सुट्याच पडतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामध्ये रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गर्भवती महिला व आबालवृद्धांची खूप परवड होत आहे.

Web Title: There is no road to Kesapuri village since independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.