जायकवाडीतून तूर्तास विसर्ग नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:06 AM2017-09-15T01:06:22+5:302017-09-15T01:06:22+5:30
जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही,
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून विभागात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयांची पाण्याची पातळी वाढली आहे. औरंगाबादचा प्रमुख जलस्रोत असलेले जायकवाडी धरण ८४.१२ टक्के (६४ टीएमसी) भरलेले असून तूर्तास पाणी सोडण्यात येणार नाही, अशी माहिती कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक बी. एस. स्वामी यांनी दिली.
वाढता साठा पाहता जायकवाडीतून पाणी सोडण्यात येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्वामी यांना विचारणा केली असता त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले, जायकवाडीतील पाणी पातळी ९४ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. नाशिककडून येणारा कमी प्रवाह लक्षात घेता सध्यातरी नदी काठच्या गावांना चिंता करण्याची गरज नाही.
पैठणमध्ये पाणी घुसू देणार नाही...
जायकवाडी धरणात साठा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील कर्मचाºयांना विशेष प्र्रशिक्षण देण्यात आले. स्वामी यांनी पैठणमध्ये जाऊन तेथील कर्मचाºयांना आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्व अभियंत्यांचा आम्ही सराव घेतला असून कुठल्याही परिस्थितीत पैठणमध्ये पाणी शिरणार नाही, याची काळजी घेतली जाईल.