विद्यापीठाच्या पंचांगात ‘पेट’साठी मुहूर्तच नाही; संशोधनासाठी विद्यार्थ्यांची उत्कंठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 01:06 PM2020-11-03T13:06:45+5:302020-11-03T13:10:42+5:30
सन २०१६ मध्ये ‘पेट’ झाल्यानंतर आजपर्यंत या परीक्षेला मुहूर्त सापडलेला नाही.
औरंगाबाद : मागील चार वर्षांपासून रखडलेली पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) चालू वर्षात देखील होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान, संशोधनासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
सन २०१६ मध्ये ‘पेट’ झाल्यानंतर आजपर्यंत या परीक्षेला मुहूर्त सापडलेला नाही. यासंदर्भात प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या व उपलब्ध गाईडकडे संशोधन करणाऱ्या विद्यार्थी संख्येमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे नव्याने ‘पेट’ घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रांगेत ठेवून त्यांना किती दिवस प्रतीक्षा करण्यास भाग पाडायचे, हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे मागील चार वर्षांत ‘पेट’ घेणे शक्य झाले नाही.
तथापि, विद्यापीठासमोर हा प्रश्न निर्माण झालेला असला, तर मग नव्याने नेट- सेट किंवा पदव्युत्तर पदवी घेऊन संशोधन करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, हाही तेवढाच महत्वाचा व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. विद्यापीठ प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या सुरू असलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम सत्राच्या परीक्षा आटोपल्यावर लगेच निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे ‘पेट’ घेण्याचे नियोजन अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. साधारणपणे जानेवारी महिन्यात ‘पेट’ घेण्याचा विद्यापीठाचा विचार सुरू आहे.