दहा वर्षांमध्ये एकही पिसाळलेला कुत्रा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:39 AM2018-11-29T00:39:03+5:302018-11-29T00:39:37+5:30
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखाहून अधिक असली तरी मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेला एकही पिसाळलेला कुत्रा आढळला नाही. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती नेमलेली आहे. या समितीची एकही बैठक घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एक लाखाहून अधिक असली तरी मागील दहा वर्षांमध्ये महापालिकेला एकही पिसाळलेला कुत्रा आढळला नाही. पिसाळलेल्या कुत्र्यांना मारण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र समिती नेमलेली आहे. या समितीची एकही बैठक घेण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी बारूदगरनाला येथील नूर पिंजारी या नऊवर्षीय मुलाचा रेबिजने मृत्यू झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेवर टीकेची प्रचंड झोड उठलेली असतानाही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. बुधवारी कुत्र्यांवर नसबंदी करणाऱ्या संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
शहरात मोकाट कुत्रे नेमके किती आहेत, याचा कोणाताही सर्व्हे महापालिकेने आजपर्यंत केलेला नाही. निव्वळ मोघम स्वरूपात आकडेवारी सांगण्यात येते. ४० ते ४५ हजार मोकाट कुत्रे असावेत, असे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून सांगण्यात येत आहे. बारूदगरनाला येथील नऊवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे शहर स्मार्ट करण्यासाठी महापालिका जोरदार प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे शहरात राहणारे नागरिक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. मंगळवारी नूर पिंजारीचा बळी गेला. उद्या आणखी कोणाचाही जाऊ शकतो. या गंभीर प्रश्नाकडे मनपा प्रशसन, पदाधिकारी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत.
शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही गंभीर आजारी, पिसाळलेले कुत्रे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. महापालिकेच्या यंत्रणेला एकही पिसाळलेला कुत्रा दहा वर्षांमध्ये सापडला नाही, म्हणजे आश्चर्य म्हणावे लागेल. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कुत्र्यांच्या नसबंदी कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी एकाही पिसाळलेल्या कुत्र्याला मारले नसल्याची माहिती समोर आली. पिसाळलेले कुत्रे शोधा समितीसमोर निर्णय घेऊन त्यांना मारण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करा, असे आदेश त्यांनी दिले.
कुत्र्यांच्या टोळ्या कुठे जास्त?
मोकाट कुत्र्यांना खाण्यासाठी जिथे मिळेल तेथे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मध्यवर्ती जकात नाका, जळगाव रोड, टाऊन हॉल, बुढीलेन, औरंगपुरा, एन- ११ टीव्ही सेंटर रोड, जटवाडा रोड, रामगिरी चौक, विठ्ठलनगर, क्रांतीचौक अशा अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. महापालिकेने आजपर्यंत असे स्पॉटही शोधून काढलेले नाहीत. मांस विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेल्या खरकट्यावर हे कुत्रे वर्षानुवर्षे जगत आहेत. महापालिका त्यादृष्टीनेही ठोस पाऊल उचलत नाही.