देशात साखळी हल्ल्याचा कट;स्फोटके, प्रशिक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनियरवर

By सुमित डोळे | Published: July 13, 2024 02:42 PM2024-07-13T14:42:14+5:302024-07-13T14:42:52+5:30

एनआयएचे दोषारोपपत्र : स्फोटक निर्मिती, प्रशिक्षणाची छत्रपती संभाजीनगरच्या झोहेबवर होती जबाबदारी

There was a conspiracy to carry out chain attacks in the country, the engineer of Chhatrapati Sambhajinagar was responsible for training 50 youths | देशात साखळी हल्ल्याचा कट;स्फोटके, प्रशिक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनियरवर

देशात साखळी हल्ल्याचा कट;स्फोटके, प्रशिक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजीनगरच्या इंजिनियरवर

छत्रपती संभाजीनगर : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली हर्सूल परिसरातून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केलेल्या मोहम्मद झोहेब खान (४०) याच्यामार्फत ५० पेक्षा अधिक तरुणांना व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन देशात साखळी हल्ले घडविण्याचा कट होता, असा धक्कादायक आरोप एनआयएने केला आहे. शुक्रवारी एनआयएच्या मुंबई न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात हे आरोप ठेवण्यात आले आहेत.

मोहम्मद झोहेब खान याला एनआयएने १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील घरातून अटक केली होती. लिबियास्थित त्याचा नातेवाईक मोहम्मद शोएब खान याने त्याला इसिसमध्ये भरती केले होते. झोहेबला आंतरराष्ट्रीय हस्तकांकडून मार्गदर्शनही सुरू होते, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले. सात महिन्यांपासून ‘एनआयए’ने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्याने इसिसची ‘बैत’ घेतली होती. वर्क फ्रॉम होमचे कारण दाखवून तो घरातूनच सूत्रे हलवत होता. एनआयएच्या पथकाने १५ फेब्रुवारी रोजी शहरात ९ ठिकाणी छापे मारत झोहेबला अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, इसिसच्या कट्टरवादाशी संबंधित पुस्तके जप्त केली होती.

दोषारोपपत्रात काय ठेवलाय ठपका?
- लिबियास्थित शोएबने झोहेबला इसिसमध्ये सहभागी केले होते. दोघे मिळून भारतविरोधी कटकारस्थान रचत होते. देशातील प्रमुख संवेदनशील स्थळांवर दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरुणांची भरतीदेखील करत होते.
- या सर्व हल्ल्याचे ते मुख्य सूत्रधार होते.
- हल्ल्यानंतर झोहेब अफगाणिस्तान किंवा तुर्कस्तानमार्गे सिरियाला जाणार होता.

वेब डेव्हलोपर ते इसिसच्या वेबसाईटची जबाबदारी
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला झोहेब बंगळुरूमध्ये नामांकित कंपनीत वेब डेव्हलोपर होता. गलेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो दहशतवादाकडे वळला. त्यानंतर तो इसिसचे संकेतस्थळ विकसित करण्यासाठीदेखील मदत करीत असल्याचे एनआयएने दोषारोपपत्रात म्हटले आहे. याद्वारे तो देशभरातील तरुणांना हिंसक विचारांकडे वळविण्यासाठी प्रोत्साहन देत होता.

५० पेक्षा अधिक तरुण संपर्कात
देशात इसिसच्या कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याची जबाबदारी झोहेबवर होती. त्यासाठी त्याने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून शहर व आसपासच्या परिसरातील ५० पेक्षा अधिक तरुणांना या ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. त्यात तो सातत्याने स्फोटकांच्या निर्मिती आणि आयईडी बनविण्याचे व्हिडीओ शेअर करीत होता. त्यानंतर कारवाईचा आराखडाही तयार केला होता. ज्यामध्ये देशातील विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन, तयारी आणि अंमलबजावणी व हल्ल्यांच्या अंमलबजावणीनंतर काय पाऊल उचलायचे, याचेदेखील पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.

Web Title: There was a conspiracy to carry out chain attacks in the country, the engineer of Chhatrapati Sambhajinagar was responsible for training 50 youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.