किराडपुऱ्यातील राममंदिर परिसरात तब्बल १९ तास वीज गूल; पिण्याचे पाणीही भरता आले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:48 PM2024-10-23T17:48:25+5:302024-10-23T17:48:49+5:30
सोमवारी रात्री ८ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता आली
छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथील राममंदिरातील विद्युत रोहित्र सोमवारी रात्री ८ वाजता जळाले. यामुळे बारी कॉलनी, रहीमनगर, किराडपुरा, शरीफ कॉलनी परिसरात तब्बल १९ तास ४० मिनिटे वीजपुरवठा बंद होता. नागरिकांना पिण्याचे पाणीही भरता आले नाही. लहान-मोठे व्यवसाय बंद होते. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सोमवारी रात्री ८ वाजता अचानक विजेचा दाब वाढल्याने राममंदिरातील विद्युत रोहित्र जळाले. ही माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत दुरुस्ती सुरू केली. रात्री दीडच्या सुमारास दुरुस्ती झाल्यानंतर रोहित्र सुरू केले. मात्र, ते पुन्हा जळाले. दुरुस्ती व नवीन रोहित्र बसविण्याचे काम मंगळवारी दिवसभर चालले. अखेर दुपारी ३.४० वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला. यादरम्यान रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित
पावसाळा सुरु झाल्यापासून नक्षत्रवाडी, इटखेडा, सुधाकरनगर, वाल्मी परिसर, छावणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भाग, हर्सूल, रामनगर, मुकुंदवाडी, नारेगाव, चिकलठाणा, गारखेडा तसेच सिडको-हडकोत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे.
आम्ही तीन रोहित्र बदलले
विजेचा दाब वाढल्याने रोहित्र नादुरुस्त झाला. रात्री १० ते ११ वाजेदरम्यान नवीन रोहित्र आणून बसवले. तेही बिघडले. अखेर तिसरा रोहित्र आणून बसवला. नंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू केला.
- अभय अरणकल्ले, सहायक अभियंता, नवाबपुरा विभाग
सणांत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न
दिवाळी सणात वीजपुरवठा बंद होवू नये म्हणून आमची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला जाईल.
- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण