स्मशानभूमीत शेड नसल्याने अंत्यविधी करावा लागला खुलताबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:05 AM2021-03-24T04:05:31+5:302021-03-24T04:05:31+5:30
खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे ...
खुलताबाद : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकळी राजेराय गावात अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. येथील स्मशानभूमीत पत्र्याचे शेड नसल्यामुळे एकाद्याचा अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी देखील कुंभकर्णी झोेपेत असलेले जिल्हा परिषद प्रशासन स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
टाकळी राजेराय येथील उमेश सेवेकर (वय ७४) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यात विजेचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस सुरू झाल्यामुळे गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी कसा करायचा, असा यक्षप्रश्न नातेवाइकांना पडला. उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर यांनी खुलताबादचे उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक योगेश बारगळ यांच्याशी संपर्क साधून खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर खुलताबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. एवढे मोठे गाव असूनदेखील येथील स्मशानभूमीची दुरुस्ती कशी होत नाही, शेड उभारण्यासाठी जिल्हा परिषदेकडून निधी दिला जात नाही का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पाठपुरावा करूनही निधी मिळेना
पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे स्मशानभूमीतील शेडसाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. तरी देखील निधी दिला जात नाही. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने याची दखल घ्यावी, अशी मागणी उपसरपंच गुलाब कुचे, आबाजी तांदळे, विलास साकळकर, किशोर टाकळकर, कडुबा भागडे, सांडू जाधव, रमेश करपे, संकेत खंडेलवाल, काकासाहेब करपे, अमोल जोशी यांनी केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य एल. जी. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, एका महिन्यात येथील स्मशानभूमीत शेड उभारण्याचे काम हाती घेतले जाईल.