कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढली
By Admin | Published: October 22, 2014 12:41 AM2014-10-22T00:41:16+5:302014-10-22T01:21:22+5:30
औरंगाबाद : राज्यातील पहिल्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
औरंगाबाद : राज्यातील पहिल्या शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांना जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्याची अपॉइंटमेंट दिली जात आहे, अशी परिस्थिती राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांत असल्याचे समोर आले आहे.
आमखास मैदान येथे दोन वर्षांपूर्वी शासकीय कॅन्सर रुग्णालय सुरू झाले. तेव्हापासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
या हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे किरणोपचार करणारे लिनिअर अॅक्सिलेटर यंत्र स्थापित करण्यात आलेले आहेत. या यंत्राद्वारे उपचार घेताना केवळ कॅन्सरच्या पेशीच नष्ट करण्यात येतात. परिणामी, किरणोपचाराचे अन्य दुष्परिणामही होत नाहीत. शंभर खाटांच्या या रुग्णालयात स्त्री आणि पुरुष रुग्ण, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड आहेत.
कॅन्सरवरील विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी चार आॅपरेशन थिएटर आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णास मोफत उपचार मिळत असल्याने रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयास पसंती दर्शवितात.
परिणामी, तेथील वॉर्ड हाऊसफुल होत आहेत. त्यामुळे तेथील यंत्रणेवर ताण पडत आहे. रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड म्हणाले की, लिनिअर अॅक्सिलेटर यंत्रावर रोज सरासरी ९० ते ११० रुग्णांवर किरणोपचार केले जातात. असे असले तरी रोज आठ रुग्णांची त्यात भर पडत असते.
रुग्णांना किरणोपचाराच्या २० ते २५ फेऱ्या करीत टप्प्या-टप्प्याने उपचार घ्यावा लागतो. तेव्हा ज्या रुग्णांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, त्यांना क्रमश: अपॉइंटमेंट दिली जाते. त्यांचा आजार समूळ नष्ट होण्यासाठी उपचाराच्या सर्व फेऱ्या देणे आवश्यक असते.
ही बाब लक्षात घेऊन आम्ही या रुग्णांचा दुसरा टप्पा होणे आवश्यक असल्याचे शासनास कळविले आहे.
नवीन रुग्णाच्या आजाराचे निदान केल्यानंतर रुग्णास किरणोपचारासाठी अपॉइंटमेंट दिली जाते. त्यानुसार आज सोमवारी आलेल्या रुग्णांस १९ जानेवारीची अपॉइंटमेंट दिली जात आहे.
ब्रॅकीथेरपी यंत्रावरही उपचार केले जातात. ज्या रुग्णांना नलिकेचा कॅन्सर आहे, अशा रुग्णांवर ब्रॅकीथेरपी केली जाते. एवढेच नव्हे तर काही रुग्णांवर घाटीतील कोबाल्ट युनिटमध्येही उपचार केले जात आहेत.