भाजपकडून डझनभर इच्छुकांच्या स्पर्धेत बागडेंच्या उत्तराधिकारी ठरल्या अनुराधा चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 07:01 PM2024-10-21T19:01:47+5:302024-10-21T19:03:51+5:30
भाजपच्या पहिल्याच यादीत फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांची उमेदवारी जाहीर
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री मतदारसंघाचे आ. हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण होणार, कुणाला विधानसभेची उमेदवारी मिळणार, या चर्चेला रविवारी पूर्णविराम मिळाला. फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर झाल्यामुळे उमेदवारीसाठी डझनभर इच्छुकांमध्ये असलेली स्पर्धा संपुष्टात आली.
भाजपाने रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ९९ उमेदवारांमध्ये मराठवाड्यातील ११ जणांना संधी देण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर व फुलंब्री मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली. फुलंब्रीतून कृउबाचे सभापती राधाकिसन पठाडे, माजी महापौर भगवान घडमोडे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, प्रदीप पाटील, किशोर शितोळे, रामूकाका शेळके, विजय औताडे आदी इच्छुक होते. सर्वांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. उमेदवारी कुणाला का मिळेना, सर्व सोबत राहू, या भावनेने सगळ्यांनी मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. परंतु, राज्यपाल बागडे यांचा नागरी सत्कार झाल्यानंतर उमेदवारीसाठी अनेकांनी आपापल्या पद्धतीने लॉबिंग केले. परंतु, चव्हाण यांनी उमेदवारीत बाजी मारली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
माझा खारीचा वाटा निश्चित
लोकमतशी बोलताना उमेदवार चव्हाण यांनी सांगितले, केंद्र आणि राज्यातील पक्ष नेतृत्त्वाने संधी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारतासाठी माझा खारीचा वाटा निश्चित असेल.