राजे, महाराजे अनेक झाले पण छत्रपती होणारे शिवाजी पहिलेच : रवींद्र पाटील
By राम शिनगारे | Published: June 6, 2023 05:33 PM2023-06-06T17:33:43+5:302023-06-06T17:34:56+5:30
विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान
छत्रपती संभाजीनगर : इतिहासासह पुराणकाळात अनेक राजे, महाराजे होऊन गेले. परंतु छत्रपती होणारे शिवाजी महाराज हे पहिलेच होय. राज्याभिषेकाची पायाभरणी ३० वर्षांपासून सुरू होती. त्याचा परिपाक म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार रवींद्र पाटील यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महात्मा फुले सभागृहात ’सांप्रत काळामध्ये छत्रपतींच्या राज्यभिषेकाची आवश्कता’ या विषयावर मंगळवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचीव डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ. योगिता होके पाटील, संचालक डॉ. राजेश रगडे यांची उपस्थिती होती.
व्याख्याते पाटील म्हणाले, ज्या काळात अन्याय, अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. साधे बोलणेही कठिण झाले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला. त्यासाठी राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा होती. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला, मात्र त्यापूर्वी ३० वर्ष या राज्याभिषेकाचीच पायाभरणी करण्यात येत होती. देशाच्या इतिहासात अनेक राजे होऊन गेले, मात्र पहिले छत्रपती शिवाजी महाराजच होच होते. साडेतीनशे वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा महिमा टिकून आहे. त्या शिवराज्यभिषेकाचा महिमा असेतूचंद्र राहील, असेही पाटील यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ’शिवराज्यांभिषेक’चे ऐतिहासिक महत्व सांगितले. प्रा.पराग हासे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.राजेश रगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.मुस्तजिब खान, प्रदीपकुमार जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.
प्रत्येकजण शिवाजी महाराजांचा मावळा
अध्यक्षीय समारोपात प्रकुलगुरु डॉ. शिरसाठ म्हणाले, शिवारायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची निर्मिती केली. त्याच मावळ्यांपैकी आपणही एक आहोत. महाराजांच्या सर्व पैलुंचा अभ्यास झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.