लॉकडाऊनमध्येही केंद्रांवर पेपर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:07+5:302021-03-26T04:06:07+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लॉकडाऊनमध्येही सुरू राहतील. प्रामुख्याने बीड ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा लॉकडाऊनमध्येही सुरू राहतील. प्रामुख्याने बीड जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान ‘लॉकडाऊन‘ केले आहे. या काळातील सर्व पेपर संबंधित महाविद्यालयात पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होतील. त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षा १६ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बीड, जालना, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नुकतेच बीड जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू केले आहे. दुसरीकडे, सद्या विद्यापीठाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात २६ मार्च, ३० मार्च, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी विद्यापीठाचे पेपर आहेत, तर उर्वरित दिवशी पेपरला सुट्ट्या आहेत.
त्यामुळे विद्यापीठाने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू केलेल्या परीक्षेत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. याची नोंद विद्यार्थी, पालक, अध्यापक व कर्मचारी, आदींनी घ्यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोर पालन करून केंद्रांवर परीक्षा घेण्यात याव्यात. दुसरीकडे, या काळात जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा द्याव्यात, असे आवाहनही संचालक डॉ. पाटील यांनी केले आहे.