चर्चा तर होणारच, विकासाच्या ‘मोदी हमी’चा जाहीरनामा कसा वाटला?
By स. सो. खंडाळकर | Published: April 19, 2024 03:52 PM2024-04-19T15:52:06+5:302024-04-19T15:52:55+5:30
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात विकास आणि कल्याणकारी योजनांना केंद्रस्थानी ठेवून मतदारांना ‘ मोदी हमी’ दिली. ‘एक देश, एक निवडणूक’ आणि समान नागरी कायदा लागू करण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करून भाजपने आपल्या ‘ संकल्पपत्रा’द्वारे ‘विकसित भारत’च्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सूचित केले.
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तसेच तृतीयपंथीयांना आयुष्यमान योजना लागू करण्याची घोषणा संकल्पपत्रात करण्यात आली आहे. घोटाळेबाजांना दयामाया न दाखवता तुरुंगात टाकणारी भ्रष्टाचारविरोधी मोहीम यापुढेही चालू राहील, अशी हमी भाजपने दिली आहे. गरीबांसाठी तीन कोटी घरे, घरोघरी पाइपद्वारे गॅसपुरवठा, न्यायसंहिता तातडीने लागू करणार, नागरिक दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार, भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणार, अशी आश्वासने यात देण्यात आली आहेत. मात्र रोजगारनिर्मिती, महागाई, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची अंमलबजावणी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची हमी, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा आदी वादग्रस्त ठरू शकणाऱ्या अनेक मुद्द्यांवर मौन बाळगण्यात आले आहे. भाजपच्या या जाहीरनाम्यावरच करण्यात आलेली ही साधकबाधक चर्चा...
एक उत्तम जाहीरनामा....
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची व्हावी, या दृष्टीने सादर करण्यात आलेला भाजपचा जाहीरनामा म्हणजे एक उत्तम जाहीरनामा होय. महिला, युवा, शेतकरी व गोरगरीब या चार घटकांकडे अधिक लक्ष देण्यासाठी योजना आखण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आता विकसित भारताचे ध्येय आहे. ही चांगली गोष्ट होय.
- हरिभाऊ बागडे, माजी सभापती, विधानसभा, महाराष्ट्र राज्य.
ज्वलंत प्रश्न बाजूला टाकले....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक उत्तम नेते म्हणून लोकांवर छाप असली तरी भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ज्वलंत प्रश्न बाजूला टाकले असल्याचे दिसून येत आहे. याउलट काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, आरक्षणाची मर्यादा हटवू, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊ, जातनिहाय जनगणना करू अशी आश्वासनं देण्यात आलेली आहेत. या मुद्यांवर भाजपच्या जाहीरनाम्यात कोणतेच भाष्य करण्यात आलेले नाही.
- सुनीता गीते, काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या माजी सदस्या
‘अच्छे दिन’ आले का?...
भाजपाचा जाहीरनामा म्हणजे भ्रामक व खोटी आश्वासने. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न... आतापर्यंत भाजपानं कोणती आश्वासनं पाळली? ‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणाले होते. आले का अच्छे दिन? जनतेची घोर निराशाच झाली ना? भाजपाचा जाहीरनामा म्हणजे मते मिळवण्याचा अजेंडा वाटतो.
- सुधाकर सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
पुन्हा जुमलेबाजी....!
भाजपचा जाहीरनामा म्हणजे पुन्हा जुमलेबाजी. मूळ प्रश्नांना यात बगल देण्याचा प्रयत्न झाला आहे. महागाई गगनाला भिडली असताना, पेट्रोल-डिझेलचे व गॅस सिलिंडरचे भाव वाढले असताना त्याबद्दल भाजप का बोलत नाही? नॉन इश्श्यूजवर चर्चा करून भाजप लोकांची दिशाभूल करीत आहे.
- किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना
संविधानाच्या सुरक्षिततेबद्दल स्पष्ट बोललं पाहिजे...
ज्वलंत प्रश्नांबद्दल भाजपच्या जाहीरनाम्यात स्पष्टता नाही. संविधानाच्या सुरक्षिततेबद्दल भाजपने स्पष्ट ग्वाही दिली पाहिजे. चारशे पारचा नारा कशासाठी? एवढं बहुमत मिळवून करायचं काय? लोकांच्या मनात शंका आहे की, संविधानच बदलले जाईल. आरक्षण व जातनिहाय जनगणनेबद्दल जाहीरनाम्यात काहीच नाही.
- रमेश गायकवाड, माजी सदस्य, जि. प., छत्रपती संभाजीनगर
सर्वसामान्यांना न्याय देणारा जाहीरनामा....
भाजपचा जाहीरनामा एकंदरीतच चांगला असून, तो सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. वीज आणि शुद्ध पाणी पुरवण्याचे आश्वासन सामान्यांना दिलासा देणारे आहे.
- अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट
अल्पसंख्यकांच्या विरोधातला जाहीरनामा
सीएए व एनआरसीचा पुरस्कार करणारा भाजपचा जाहीरनामा या देशातील अल्पसंख्यकांच्या विरोधी जाहीरनामा होय. सीएए व एनआरसीचा पुरस्कार म्हणजे संविधानविरोधी कृत्य होय. एमआयएम याचा नेहमीच विरोध करीत आलेली आहे व पुढेही करेल.
- शारेक नक्षबंदी, शहराध्यक्ष, एमआयएम