घाटीपाठोपाठ शहरात होणार आणखी एक शासकीय रक्तपेढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:04 AM2021-07-16T04:04:22+5:302021-07-16T04:04:22+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : चिकलठाणा येथील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सादर करण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि रुग्णालयात नियमित रुग्णसेवा सुरू होताच रक्तपेढीचा प्रस्ताव मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. घाटीपाठोपाठ शहरात आणखी एक शासकीय रक्तपेढी उपलब्ध होणार आहे.
शहरात सध्या घाटीतील विभागीय रक्तपेढीसह ८ रक्तपेढ्या आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयातील नियमित सेवा थांबविण्यात आली असून, येथे गेल्या दीड वर्षांपासून केवळ कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. त्यासाठी रुग्णालयात अतिरिक्त १०० खाटा वाढविण्यात आल्या आहे. काही दिवसांपूर्वीच ओपीडी सेवा सुरू झाली असून, अन्य सेवा कधी सुरळीत होतात, याकडे लक्ष लागले आहे. प्रसूतीसह अन्य शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताची गरज भासते. रुग्णांसाठी बाहेरून रक्त आणावे लागण्याच्या परिस्थितीने जिल्हा रुग्णालयात रक्तपेढीही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव मार्गी लागल्याची शक्यता असतानाच कोरोना विळखा पडला. परंतु, आता पुन्हा एकदा या प्रस्तावासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लवकरच रक्तपेढी अस्तित्वात येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.
पाठपुरावा सुरू
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा प्रस्ताव मुंबईला पाठविण्यात आला असल्याचे विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. सविता साेनवणे यांनी सांगितले. रक्तपेढीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जात आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.