वाळूज महानगरात जैवयांत्रिकी खत प्रकल्प येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:48 PM2018-05-30T12:48:46+5:302018-05-30T12:49:34+5:30
सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाळूज महानगर ( औरंगाबाद ): सिडको वाळूज महानगरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने पावले उचलली असून, नवी मुंबईच्या धर्तीवर वाळूजला स्वतंत्र जैव यांत्रिकी खत प्रकल्प (बायो मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रोजेक्ट) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच प्रकल्प उभारणीला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पात दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.
औरंगाबाद महापालिकेचा कचऱ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून धुमसत आहे. महापालिकेला भेडसावणाऱ्या कचरा प्रश्नावर अद्याप तोडगा निघत नसताना सिडको प्रशासनाने वाळूज महानगरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. ओला, सुका व टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.३ वर्षांपासून सिडको हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवीत आहे. सिडकोने नवी मुंबई येथे जैव यांत्रिक खत प्रकल्प उभारून येथील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढला आहे.
सिडको वाळूज महानगरातून आजघडीला दररोज जवळपास तीन ते साडेतीन मेट्रिक टन कचरा संकलित केला जात आहे. दिवसेंदिवस सिडको परिसराचा झपाट्याने विकास होत असून, नागरी वसाहती वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेसारखा कचरा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सिडको प्रशासन आतापासूनच घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात काळजी घेत आहे.नवी मुंबईच्या धरतीवर येथे स्वतंत्र जैव यांत्रिक प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मुंबई कार्यालयास पाठविला आहे. या प्रस्तावला मुंबई येथील कार्यालयातून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महानगर १ मध्ये होणार प्रकल्प
या प्रकल्पासाठी सिडको वाळूज महानगर १ येथे जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून ४५० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दररोज ५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.
प्रकल्प फायदेशीरच
या प्रकल्पापासून दुर्गंधी पसरत नसल्याने निवासी क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याला धोका नाही. कचरा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. शिवाय प्रकल्पात तयार होणारे खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना खत उपलब्ध होणार आहे. यातून सिडकोला उत्पन्न होणार आहे.