कंपनीत नोकरी अन् शिक्षण दोन्ही होणार; विद्यापीठात ऑनलाइन व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू

By विजय सरवदे | Published: June 29, 2024 12:15 PM2024-06-29T12:15:27+5:302024-06-29T12:16:03+5:30

युवकांसाठी विद्यापीठात अभ्यासक्रम; पहिल्याच दिवशी शंभर जागांसाठी नोंदणी

There will be both employment and education in the company; Online vocational courses started in the university | कंपनीत नोकरी अन् शिक्षण दोन्ही होणार; विद्यापीठात ऑनलाइन व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू

कंपनीत नोकरी अन् शिक्षण दोन्ही होणार; विद्यापीठात ऑनलाइन व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने कंपनीत नोकरी करणाऱ्या युवकांसाठी बी.व्होक (इंडस्ट्री ॲम्बेडेड) हा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी सर्वच शंभर जागांसाठी नोंदणी झाली असून, येत्या ऑगस्टपासून बॅच सुरू होणार आहे. विद्यापीठातील दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र येथे बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज (इंडस्ट्री ॲम्बेडेड) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. विजय फुलारी होते. यावेळी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल पी. एन. अनंत नारायणन होते, तर प्रकुलगुरू प्रा. डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, ‘मासिआ’चे अध्यक्ष चेतन राऊत, प्रा. भारती गवळी, मेटिस्किल ग्लोबल सोल्युशन्सचे विंग कमांडर संदीप राज, सुंदर व्ही, नुरुद्दीन ताहेर, बजाज ऑटोचे डेप्युटी कमांडर सूर्यवंशी, इंद्रजित शाह, दीपक निकम आदी उपस्थित होते.

पदवी मिळवताना व्यावहारिक अनुभव प्राप्त करणे, विद्यार्थ्यांना संधी देऊन शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे, हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे. या अभ्यासक्रमासाठी पात्रता १२वी, आयटीआय किंवा डिप्लोमा, ऑटोमोबाइल आणि इंडस्ट्रियलमध्ये बी. वोक (इंडस्ट्री ॲम्बेडेड) अभ्यासक्रम ऑटोमेशन येत्या १ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न राहून कौशल्याधारित युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देऊ, अशी ग्वाही उद्योजकांनी दिली. विद्यापीठ प्रशासन हे उद्योजकांसोबत सकारात्मक व कृतिशील सहकार्य करेल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिली. या विभागात बी.व्होक (इंडस्ट्रियल ऑटोमेशन) व बी.व्होक (ऑटोमोबाइल ) हे दोन अभ्यासक्रम अगोदरच सुरू असून, आता या नवीन अभ्यासक्रमाची भर पडली आहे. हे दोन्ही कोर्ससाठी प्रत्येकी ५० जणांची आजच नोंदणी झाली आहे.

Web Title: There will be both employment and education in the company; Online vocational courses started in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.