आता महाविद्यालयांमध्ये होणार दीक्षांत सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:01 AM2018-05-08T01:01:32+5:302018-05-08T01:02:42+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्येही यावर्षीपासून दीक्षांत सोहळा होणार असल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत महाविद्यालयांमध्ये दीक्षांत सोहळे होतील. यात केवळ पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्या दिल्या जातील. पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी.ची पदवी ही विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा १५ मे रोजी आयोजित केला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मात्र, या दिवशी पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप होणार नसल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. पदवी अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप १६ ते ३० मेदरम्यान महाविद्यालयांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये होणार आहे.
यावर्षीपासून हा नवीन बदल करण्यात येत आहे. मुंबई, पुणे विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीचे महाविद्यालयात दीक्षांत सोहळे घेण्यात येतात. त्याचीच पुनरावृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदव्युत्तर, एम.फिल. आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांचीच पदवी प्रदान केली जाणार आहे. यामुळे महाविद्यालयांमध्येही दीक्षांत सोहळ्याची रेलचेल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियम कडक करणार
विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये महाविद्यालयांना दीक्षांत समारंभ किंवा विद्यार्थ्यांमध्ये पदव्यांचे वाटप करावे लागणार आहे. यासाठी विद्यापीठात पाळण्यात येणारे सर्व नियम महाविद्यालयांनाही पाळावे लागतील. कोणत्याही विद्यार्थ्याची पदवी गहाळ होणे, न देणे याला महाविद्यालयेच पूर्णपणे जबाबदारी राहतील, असेही डॉ. नेटके म्हणाले.
विद्यार्थ्यांचे पदवी अर्ज भरून घेतले
४विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा अर्ज दाखल करतानाच पदवीचेही अर्ज भरून घेतले असल्याची माहिती डॉ. नेटके यांनी दिली. यापूर्वी दीक्षांत सोहळ्यात १० टक्के विद्यार्थीही पदवी घेत नव्हते. यामुळे विद्यापीठाकडे लाखो पदव्या अनेक वर्षांपासून जमा आहेत. यातून विद्यापीठाचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडालेला आहे. यावर उपाय म्हणून अंतिम सत्राची परीक्षा देण्यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून पदवी अर्ज भरून घ्यायचा आणि दीक्षांत सोहळा होताच पदवी संबंधित महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात येणार आहे. याविषयीचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झाल्याचेही डॉ. नेटके यांनी सांगितले. याची अंमलबजावणी १५ मेनंतर होणार आहे.