विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:35 PM2024-07-29T19:35:44+5:302024-07-29T19:36:13+5:30

सहा संवैधानिक पदांसाठी पुन्हा मागविले अर्ज

There will be full-time appointment of Registrar, Director of Examinations in the BAMU University | विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती होणार

विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती होणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहा संवैधानिक पदांवर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यासाठी पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वीही संबंधित पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, त्यास प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे पुन्हा एकदा अर्ज मागविण्यात आले आहेत.

विद्यापीठातील कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांसह सहा पदे मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात सुरुवातीच्या टप्प्यातच डॉ. धनराज माने हे कुलसचिव पदावरूनच राज्याचे उच्च शिक्षण संचालकपदी रुजू झाले. त्यानंतर डॉ. प्रमोद येवले यांच्या कार्यकाळात कुलसचिव व परीक्षा संचालक ही दोन्ही पदे भरण्यात आली होती. मात्र, संबंधितांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिला. तेव्हापासून प्रभारी राज सुरू आहे. माजी कुलगुरू डॉ. येवले यांनी सहा पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच डॉ. येवले यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यामुळे त्यांनी मुलाखती घेतल्याच नाहीत. नव्याने कुलगुरू झालेले डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यांनी सहा पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेची मान्यताही घेतली आहे. त्यानुसार कुलसचिव, परीक्षा संचालकांसह विद्यापीठ उपपरिसर संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन मंडळ संचालक, ज्ञान स्रोत केंद्र संचालक, आजीवन अध्ययन व विस्तार संचालक पदांसाठी २५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. दोन सप्टेंबरपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी सादर करावी लागेल, असेही याविषयीच्या पत्रकात म्हटले आहे.

विधानसभेच्या पूर्वी नियुक्ती अशक्य
विद्यापीठ प्रशासनाने सहा संवैधानिक पदांसाठी अर्ज मागविले असले तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे दुरापास्त आहे. दोन सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांची छाननी करून, पात्रताधारकांची यादी जाहीर करणे, त्यानंतर मुलाखतीचा कार्यक्रम घोषित करावा लागेल. विधानसभेची आचारसंहिता सप्टेंबरच्या मध्यानंतर केव्हाही लागू शकते. त्यामुळे त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Web Title: There will be full-time appointment of Registrar, Director of Examinations in the BAMU University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.