आरोग्य सुविधेत वाढ होणार; औरंगाबाद महापालिका शहरात ११ आधुनिक रुग्णालये उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 01:31 PM2021-12-02T13:31:14+5:302021-12-02T13:35:01+5:30
Aurangabad Municipal Corporation : पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार स्मार्ट हेल्थ उपक्रमांतर्गत सातारा, देवळाई, विटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्र उभारण्यात येईल.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयावरील वाढत्या रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने बुधवारी एक मोठे पाऊल उचलले. स्मार्ट सिटीतून तब्बल ४० कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला (There will be an increase in health facilities in Aurangabad) . आंबेडकरनगर, सिडको एन-२ कम्युनिटी सेंटरजवळ १० कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. गजानननगरात २ कोटींचे आणखी एक रुग्णालय उभारण्याचा मनोदय स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai ) यांच्या सूचनेनुसार स्मार्ट हेल्थ उपक्रमांतर्गत सातारा, देवळाई, विटखेडा, हर्षनगर येथे प्रत्येकी ७५ लाख रुपये खर्चुन आरोग्य केंद्र उभारण्यात येईल. नवीन आरोग्य केंद्र उभारण्यासाठी अनेक ठिकाणी जागा नाही, त्यामुळे मिसारवाडी, राजनगर, मुकुंदवाडी, गरमपाणी, आंबिकानगर, जयभवानीनगर, पुुंडलिकनगर या भागात जागांचा शोध घेण्यात येत आहे. महापालिकेचे आरोग्य केंद्राच्या काही इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे सिल्कमिल कॉलनी, कैसर कॉलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-८, राजनगर, चिकलठाणा, जवाहर कॉलनी, नेहरूनगर, पदमपुरा, औरंगपुरा, जुना बाजार, मुकुंदवाडी, औषधी भांडारसाठी नवीन इमारत उभारण्यात येईल.
एकीकडे आरोग्य यंत्रणा मजबूत करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळही लागणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनयूएचएम) अंतर्गत नवीन आरोग्य केंद्रांसाठी मनुष्यबळ पुरविण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. नवीन आरोग्य केंद्राच्या उभारणीचे काम सुरू होताच मनुष्यबळाचा प्रस्ताव पाठवला जाईल, असे पाण्डेय यांनी सांगितले.
३९ आरोग्य केंद्रे, ५ रुग्णालये
महापालिकेकडून सध्या शहरात ३९ आरोग्य केंद्रे, ०५ रुग्णालये चालविण्यात येतात; परंतु दर्जेदार आरोग्य सुविधा नागरिकांना मिळत नाही. रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये घाटी रुग्णालयावरील ताण प्रचंड वाढला आहे.
डीपीआर तयार करण्याची सूचना
स्मार्ट सिटी योजनेतून ४० कोटी रुपये आरोग्य व्यवस्थेवर खर्च होणार आहेत. शहरातील मनपाचे मोठे रुग्णालये स्पेशालिस्ट असतील. तेथे मोठ्या आजारांवर उपचार होतील. सध्या प्रकल्प आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. मार्च २०२२ मध्ये कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षाही पाण्डेय यांनी व्यक्त केली.