थर्माकोलवरची बंदी उठविली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:01 AM2018-09-08T00:01:58+5:302018-09-08T00:03:17+5:30
राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीचा निर्णय घेतला असला तरी मागील आठवडाभरापासून शहरात प्लास्टिकच्या कॅरिबॅग, थर्माकोलच्या प्लेटसह सजावटीचे सामान सर्रास विकले जात आहे. अनेकांनी आपल्या दुकानांसमोरच थर्माकोल विक्रीसाठी ठेवून बंदी धाब्यावर बसविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीचा निर्णय घेतला असला तरी मागील आठवडाभरापासून शहरात प्लास्टिकच्या कॅरिबॅग, थर्माकोलच्या प्लेटसह सजावटीचे सामान सर्रास विकले जात आहे. अनेकांनी आपल्या दुकानांसमोरच थर्माकोल विक्रीसाठी ठेवून बंदी धाब्यावर बसविली आहे.
न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवून त्यांनी मागील वर्षीचे शिल्लक थर्माकोल, मखर पुन्हा विक्रीला काढले आहे. न्यायालयाचा आदेश मोडल्यास दंडाची व शिक्षेची तरतूद असतानाही या विक्रेत्यांचे धाडस एवढे वाढले की त्यांनी थर्माकोलचा बाजार थेट दुकानासमोर मांडला. मागील वर्षीपेक्षा २ ते ५ रुपये भाववाढ करून चढ्या दरात हे थर्माकोल विकले जात आहे. एवढेच नव्हे तर थर्माकोलच्या ताट विक्रीवरही बंदी आणण्यात आली आहे. मनपाने कारवाई सुरू करताच सुरुवातीचे काही दिवस हे थर्माकोलचे ताट बाजारातून गायब झाले होते, पण कारवाई ढिल्ली पडताच पुन्हा ते विक्रीला बाजारात आले आहेत. मोंढा व आसपासच्या अनेक दुकानांमध्ये थर्माकोलचे ताट सर्रासपणे विकले जात आहे. प्लास्टिकचे ग्लासही अनेक जणांकडे मिळत आहे. सध्या बाजारात येणारे थर्माकोल, थर्माकोल ताट, प्लास्टिकचे ग्लास कुठून येत आहेत, असा प्रश्न पडत आहे.
गुजरातमधून कॅरिबॅगची आवक सुरूच
प्लास्टिक कॅरिबॅग विक्रीवर बंदी आहे. त्यातही ५० मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या कॅरिबॅगवर उत्पादन व विक्रीवर बंदी आणली आहे; पण सर्रासपणे या कॅरिबॅग विकल्या जात आहेत. शहागंज, औरंगपुरा, गारखेडा परिसर, जाधववाडी बाजार समिती, हडको या परिसरात कॅरिबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गुजरातमधून या कॅरिबॅग आणण्यात येत आहेत. मध्यंतरी मनपा पथकाच्या कारवाईमुळे कॅरिबॅगच्या विक्रीवर परिणाम झाला होता. मात्र, फळ, भाजीपाल्याचे किरकोळ विक्रेते आता बिनधास्त या कॅरिबॅग ग्राहकांना देऊ लागले आहेत.