माऊलीनगरातील दोन फ्लॅट फोडून सुमारे १० तोळ्याचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:21 AM2020-12-11T04:21:12+5:302020-12-11T04:21:12+5:30
औरंगाबाद: देवळाई परिसर, माऊलीनगरातील अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ९ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख २३ ...
औरंगाबाद: देवळाई परिसर, माऊलीनगरातील अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे ९ तोळे ६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख २३ हजार रुपये आणि चांदीच्या वस्तू लंपास केल्या. याविषयी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार प्रकाश सूर्यकांत टीपराळे (३१, रा माऊलीनगर ) हे खासगी कंपनीत काम करतात. ते ६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पत्नीसह लातूर येथे पाहुण्याकडे लग्नसमारंभासाठी गेले होते. यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी कडीकोंडा तोडला. बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. साडेतीन तोळ्याचे मिनी गंठण, साडेपाच ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, ७ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील लटकन, लहान मुलांचे कानातील कुडकं आणि चांदीच्या तीन वाट्या असा ऐवज चोरून नेला. ८ डिसेंबर रोजी सकाळी प्रकाश गावाहून परतले तेव्हा त्यांना चोरट्यांनी घर फोडल्याचे दिसले.
यासोबतच त्यांच्या बिल्डींगमधील वरच्या मजल्यावरील रहिवासी ज्ञानेश्वर जाधव यांचा फ्लॅट चोरट्यांनी फोडला. ज्ञानेश्वर त्यांच्या घरातून १४ ग्रॅमची पोत, १७ ग्रॅम सोन्याचे मिनी गंठण, ७ ग्रॅमचे झुमके, ५ ग्रॅमची सोन्याचे वेल, अर्धा ग्रॅमची मोरणी, गळ्यातील सोन्याचे बालाजी पदक, चांदीची साखळी आणि २३ हजार रुपये रोख लंपास केले. या घटनेची माहिती प्रकाश आणि मनोज यांनी चिकलठाणा पोलिसांना कळविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सपोनि पाटील यांनी दिली.