कुख्यात इम्रानला पळविण्यासाठी औरंगाबादमध्ये आल्या होत्या ३ टोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:45 AM2018-08-30T00:45:39+5:302018-08-30T00:46:49+5:30
कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी याला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन टोळ्या सोमवारी (दि.२७) शहरात आल्या होत्या.
औरंगाबाद : कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहदी याला पोलिसांच्या तावडीतून सोडविण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन टोळ्या सोमवारी (दि.२७) शहरात आल्या होत्या. यापैकी मध्यप्रदेशातील एक टोळी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी इम्रानला कडेकोट सुरक्षेत न्यायालयात आणल्याचे पाहून अन्य टोळ्यांनी पोलिसांवर चाल करण्याचे धाडस केले नाही, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा आता अन्य टोळ्यांचा शोध घेत आहे.
गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या खूनप्रकरणी आरोपी इम्रान मेहदीसह त्याच्या ८ साथीदारांना सोमवारी न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली. इम्रान आणि त्याच्या साथीदारांना कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्यासाठी केवळ सहा पोलिसांचा बंदोबस्त असायचा. ही बाब त्याच्या साथीदारांनी हेरली. पोलिसांवर गोळीबार करून त्याला पळवून नेण्याचा कट कॅप्टन नावाच्या आरोपीने रचला. त्यानुसार मध्यप्रदेशातील शार्पशूटरसह सात जणांची टोळी औरंगाबादेत आली होती. यासोबतच मुंबई आणि अन्य एका जिल्ह्यातील सशस्त्र टोळीही आली होती. तीन टोळ्यांसाठी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन योजना गुन्हेगारांनी तयार केल्या होत्या. मध्यप्रदेशातील टोळीला प्लॅन ‘ए’, पहिली टोळीची योजना फसल्यास दुसरी टोळी प्लॅन ‘बी’ची अंमलबजावणी करणार होती. दुसऱ्या टोळीलाही यश न मिळाल्यास प्लॅन ‘सी’ची अंमलबजावणी तिसरी टोळी करणार होती.
इम्रान मेहदीला पळवून नेण्याच्या कटाची माहिती खबऱ्याने २३ आॅगस्ट रोजीच गुन्हे शाखेला दिली आणि पोलीस सतर्क झाले. २४ आॅगस्टला इम्रानला शिक्षा ठोठावली जाणार होती. एवढ्या कमी वेळेत आरोपींना पकडणे शक्य नसल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयास केली. त्यानंतर २७ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र बसून इम्रान मेहदी आणि त्याच्या टोळीला कारागृहातून न्यायालयात सुरक्षित नेण्या-आणण्याची तयारी केली. त्यांच्या जाण्या-येण्याचा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेचा एक दिवस आधीच सरावही केला. खबऱ्यांनाही कामाला लावले. सोमवारी सकाळीच मध्यप्रदेशातून आलेल्या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पाठलाग करून नारेगाव चौक ाजवळ पोलिसांनी सशस्त्र टोळीच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईची माहिती अन्य टोळ्यांना कळली; मात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहून अन्य टोळ्यांनी सतर्क पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस केले नाही.
जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर हल्ल्याचा कट
सूत्रांनी सांगितले की, मध्यप्रदेशातून आलेल्या शार्पशूटर गँगने इम्रान मेहदीला सोडविण्यासाठी रचलेल्या कटानुसार ते हर्सूल जेल ते दिल्ली गेट दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणार होते. त्यासाठी त्यांनी या मार्गाची रेकी केली होती. २७ रोजी रेकी करीत ते दिल्लीगेट येथे थांबले होते. त्याचवेळी तेथे असलेल्या साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. एवढेच नव्हे, तर तेथे पोलीस असल्याचे आरोपींच्या लक्षात आले होते. यामुळे पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने आरोपी तेथून लगेच कटकटगेटच्या दिशेने आणि नंतर नारेगाव येथे गेले होते.