मेव्हणे-मेव्हणे दाजीला मारायला आले, ते न भेटल्याने दाजीच्या पाहुण्याला संपविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:17 PM2024-10-22T16:17:08+5:302024-10-22T16:17:21+5:30
सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावात चाकूने भोसकून खून, एका आरोपीला अटक
सिल्लोड : बहिणीला सासरी घेऊन गेल्याने रागात येऊन दोन साले व एका सालीने दाजीचे घर गाठले. तेथे दाजी न सापडल्याने घरात असलेल्या दाजीच्या बहिणीला व दाजीला चाकूने भोसकले. यात सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी आहे. ही थरारक घटना डोंगरगाव (ता. सिल्लोड) येथे रविवारी रात्री ९ वाजता घडली. शंकर गजू टटवारे (वय ३०, रा. खंडवा, मध्य प्रदेश, ह.मु. डोंगरगाव) असे मयताचे नाव असून आतिश फूलचंद नागणे, अमोल फूलचंद नागणे, सविता प्रल्हाद गायकवाड (तिघे रा. चंदनझिरा, जि. जालना) हे आरोपी आहेत.
डोंगरगाव येथील अनिल संजय सोनवणे यांचा प्रेमविवाह चंदनझिरा (जालना) येथील सुनीता नागणेसोबत चार वर्षांपूर्वी झालेला आहे. अनिल हे छ. संभाजीनगरात एका कंपनीत काम करतात. मात्र, गेल्या आठ महिन्यांपूर्वी वाद झाल्याने त्यांची पत्नी सुनीता या माहेरी चंदनझिरा येथे राहत होत्या. रविवारी (दि.२०) सुनीताला आणण्यासाठी अनिल हे चंदनझिरा येथे गेल्यानंतर तेथे सासरच्या लोकांसोबत त्यांचे भांडण झाले. यानंतर सासरच्यांचा विरोध असूनही ते पत्नी सुनीताला घेऊन छ. संभाजीनगरला आले.
यामुळे रागात आलेले अनिल यांचे दोन्ही साले आतिश नागणे, अमोल नागणे व साली सविता प्रल्हाद गायकवाड हे या दोघांना शोधत डोंगरगावला आले. मात्र, तेथे अनिल व सुनीता नव्हते. यावेळी घरात अनिलचा भाऊ सुनील, वडील संजय, दाजी शंकर टटवारे व बहीण पूजा टटवारे होती. वरील तिन्ही आरोपींनी अनिल कुठे आहे, असे म्हणत अनिलच्या वडील व भावाला मारहाण सुरू केली. यावेळी अनिल यांचे दाजी शंकर व बहीण पूजा हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. आरोपींनी यावेळी कमरेचा चाकू काढून शंकर यांच्या पोटात व छातीत खुपसला, तसेच पूजावरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले.
यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शंकर व पूजा यांना नातेवाइकांनी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय व तेथून छ. संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे रात्री १२ वाजता डॉक्टरांनी शंकर यांना मयत घोषित केले, तर पूजा यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एक आरोपी अटकेत
या खूनप्रकरणी सुनील संजय सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींवर सोमवारी सायंकाळी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून यातील आरोपी अमोल नागणे व सविता गायकवाड यांना अटक केली असून एक फरार आहे.