हे आहेत प्राण्यांसाठी आरोग्य शिबिरे घेणारे अवलिया; खेड्यापाड्यांत देतात मोफत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 03:57 PM2022-03-08T15:57:12+5:302022-03-08T15:58:07+5:30
सौर ऊर्जेवर चालणारी रुग्णवाहिका, चालते-फिरते शस्त्रक्रियागृहदेखील
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : माणसांच्या विविध आजारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन हे नेहमीच ऐकण्यात येते; परंतु औरंगाबादेत असे काही अवलिया आहेत, जे प्राण्यांच्या आरोग्यासाठी (health camps for animals) खेड्यापाड्यात जाऊन मोफत शिबिर घेत आहेत. शिबिरात जर एखाद्या प्राण्यावर शस्त्रक्रियेची गरज पडली तर तीदेखील तत्काळ केली जाते. त्यासाठी चालते-फिरते शस्त्रक्रियागृह असलेली रुग्णवाहिकाही त्यांच्या ताफ्यात आहे.
औरंगाबादेतील हे अवलिया आहेत होप ॲण्ड ॲनिमल ट्रस्टचे सचिव प्रवीण ओहळ, पशुचिकित्सक डाॅ. गणेश चेडे, औरंगाबाद फाॅर ॲनिमल्सच्या व्यवस्थापिका शक्ती वाखले, सहायक पशुचिकित्सक सुनील आणि प्रशिक. होप ॲण्ड ॲनिमल ट्रस्ट, औरंगाबाद फाॅर ॲनिमल या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून प्राण्यांसाठी हे सर्व जण अहाेरात्र झटत आहेत. या संस्थेचे जांभाळा येथे प्राण्यांसाठी निवारागृह आहे. शहरातील मोकाट कुत्रे आणि इतर प्राण्यांची प्रशासनातर्फे व्यवस्था होते; परंतु ग्रामीण भागातील प्राण्यांकडे काहीसे दुर्लक्ष होते. ही बाब ओळखून संस्थेने सौर ऊर्जेवर चालणारी आगळीवेगळी रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेत भटक्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. त्याबरोबर याच रुग्णवाहिकेत ओटी टेबलही आहे.
नागरिकांना वाटते कुतूहल
ग्रामीण भागात गेल्यानंतर प्राण्यांसाठी आरोग्य शिबिर आहे, सांगितल्यानंतर अनेकांना कुतूहल वाटते. मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची शस्त्रक्रिया आणि इतर काही शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली तर तीही या रुग्णवाहिकेत करता येते. औरंगाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये प्राण्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. शिबिरांमुळे अनेक प्राण्यांना जीवदानदेखील मिळाले आहे.
पक्ष्यालाही जीवदान
शक्ती वाखले म्हणाल्या, शिबिरात एकदा एक व्यक्ती मोठा पक्षी घेऊन आला होता. या पक्ष्यावर उपचार करून वन विभागाच्या ताब्यात दिले. मोकाट कुत्र्यांना कसे हाताळले पाहिजे, याचे प्रशिक्षणही आम्ही नागरिकांना देताे. गावात गेल्यानंतर विविध प्राणी घेऊन नागरिक येतात. त्यांच्यावर मोफत उपचार करतो.