नकोशी समजून टाकून दिली, पण निघाला मुलगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:49 PM2020-10-02T15:49:36+5:302020-10-02T15:50:18+5:30
पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक फेकले. मात्र हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ते आमचेच असल्याचा दावा दाम्पत्याने केला.
सुनील शिरोडे
शिऊर : पाच मुलींच्या पाठीवर पुन्हा सहावी मुलगीच झाल्याचा संशय आल्याने जन्मदात्या आईनेच अवघ्या चार तासांचे अर्भक फेकले. मात्र हे अर्भक मुलगी नसून मुलगा असल्याचे समोर येताच ते आमचेच असल्याचा दावा दाम्पत्याने केला.
वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे घडलेल्या या घटनेने गुरूवारी परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी अर्भकासह दावा करणाऱ्या माता, पित्यास औरंगाबादला डी. एन. ए चाचणी करण्यासाठी पाठविले आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांत दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टुनकी शिवारातील गट क्रं. ११० मध्ये बुधवारी सकाळीच अवघ्या चार तासांचे पुरूष जातीचे अर्भक सापडले. यासंबंधी पेालीस पाटील रावण निकम यांनी सदरील घटनेची माहिती शिऊर पोलीसांना कळविली. त्यांनी अर्भकाला तातडीने औरंगाबादला घाटी रूग्णालयात पाठविले पण पुरूष जातीचे अर्भक सापडले अशी चर्चा गावात होताच सुनीता अशोक साळुंके व अशोक चंद्रभान साळुंके यांनी दावा करत हे अर्भक आम्हीच फेकले असल्याची कबुली पोलिसांना दिली. डीएनए चाचणीचा निकाल आल्यानंतरच या प्रकरणाला गती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.