'मला 'ते' सतत डावलत असतात'; अंबादास दानवेंच्या मनातील खदखद बाहेर, पक्षांतरावर म्हणाले...
By बापू सोळुंके | Published: March 16, 2024 11:50 AM2024-03-16T11:50:05+5:302024-03-16T11:52:14+5:30
आपण नाराज नाही आणि शिंदे गटात जाणार नसल्याचे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगरः चंद्रकांत खैरे हे नेहमीच आपल्याला डावलतात. आपण त्यांच्याकडे पाहून नाही तर उद्धव साहेबांसाठी पक्षाचे काम करीत असल्याचे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना येथे केले. आपण नाराज नाही आणि शिंदे गटात जाणार नसल्याचे दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. दानवे हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त लोकमतने आज प्रकाशित करतात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुंबईहून शहरात परतलेल्या दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मागील दहा वर्षापासून आपण औरंगाबाद लोकसभेसाठी (छत्रपती संभाजी नगर )साठी इच्छुक आहोत. उमेदवार बदला असे आपण पक्षप्रमुखांना सांगितलं आहे. चंद्रकांत खैरे यांचा या निवडणुकीत पराभव होऊ शकतो. यामुळे तसे झाल्यास पुन्हा अंबादास मुळे पराभव झाला असा ठपका ठेवल्या जाऊ नये यासाठी आपण पक्षप्रमुखांना उमेदवार बदलण्याची विनंती केली आहे. पक्षप्रमुखांनी अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा केली नाही. चंद्रकांत खैरे हे सतत आपल्याला डावलत असतात. परवा झालेल्या स्तंभ पूजन कार्यक्रमाची आपल्याला माहिती देण्यात आली नव्हती ,असे सांगून दानवे यांनी त्यांच्या मनातली नाराजी बोलून दाखविली.
शिंदे सेना पक्ष केवळ केवळ पाच दिवसांचा
निवडणुकीच्या तोंडावर आपण शिंदे गटात प्रवेश करणार, अशा बातम्या येत राहतात मात्र यात काही तथ्य नाही शिंदे शिवसेना पाच दिवसासाठीच आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचा दावाही दानवे यांनी केला.