'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 04:51 PM2023-10-19T16:51:40+5:302023-10-19T16:53:03+5:30
परिस्थिती बिकट होती पण त्यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता
- अमेय पाठक
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, हे समजताच छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. मूळचे जालन्याचे असलेले कावळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत. मी मुंबईला जात असून आता मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्यासोबतच राहणार आहे. आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
आंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेनंतर सुनील कावळे यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता. मंगळवारी कावळे यांनी कामानिमित्त मुंबईला जात आहे असे सांगितले. इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.त्यानंतर बुधवारी रात्री कावळे यांनी मुंबईतील बीकेसी येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेत जीव संपवले. याची माहिती मिळताच कावळे कुटुंबाला धक्का बसला.
जरांगेंसोबत राहण्याचा निर्धार
नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं. नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं.
परिस्थिती बिकट होती पण त्यांना आरक्षणाचा ध्यास होता
सुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे.जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.