'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:42 PM2023-08-29T12:42:27+5:302023-08-29T12:43:10+5:30

सहा तासांच्या थाळीनाद आंदोलनाने उपनिबंधक कार्यालयासह पोलिस आयुक्तालय दणाणले

'They' let the 'Adarsh' credit bank scammed by bribe; Sensational allegations of depositors against upnibandhak karyalaya | 'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

'त्यांनी' पैसे खाऊन 'आदर्श' पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला; ठेवीदारांचा खळबळजनक आरोप

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा होऊ दिला. गेल्या आठ वर्षांमध्ये कलम ८९ नुसार तीन वर्षांनी चौकशी का झाली नाही, पतसंस्थेच्या विनापरवाना २८ शाखा कशा सुरू होत्या, असे प्रश्न विचारत शेकडो ठेवीदारांनी सोमवारी थाळीनाद आंदोलन केले. खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली उपनिबंधक कार्यालयासमोर अडीच तास आंदोलन झाल्यानंतर पोलिस आयुक्तालयावर देखील मोर्चा वळवून तेथे पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

जुलै महिन्यात पतसंस्थेच्या २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. शेकडो ठेवीदारांच्या ठेवी पतसंस्थेत अडकल्या. परंतु काही मुख्य आराेपी अद्यापही पसार असून तीन लेखापरीक्षकांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. परंतु उपनिबंधक विभागाचे अधिकारी या घोटाळ्यातून नामानिराळे राहिले. याविरोधात सोमवारी आंदोलन छेडण्यात आले. सकाळी अकरा वाजेपासून पुष्पनगरीच्या कार्यालयासमोर हातात ताट आणि चमचा घेऊन ठेवीदारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. क्रांती चौक, वेदांतनगर पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी तैनात होते. संतप्त ठेवीदारांकडून कार्यालयाच्या दिशेने प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. यावेळी उपनिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी कार्यालयातच होते. दुपारी बारा वाजता खा. इम्तियाज मोर्चात सहभागी झाले. तीन वाजता त्यांनी पायी पोलिस आयुक्तालयाकडे मोर्चा वळवला. तेथे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत पारदर्शक कारवाईचे आश्वासन दिले.

अधाने, सुनील सापडत कसे नाहीत?
अट्टल गुन्हेगारांना पकडणाऱ्या पोलिसांना अद्यापही घोटाळ्यातील मुख्य आरोपी देवीदास अधाने, सुनील मानकापे सापडले नसल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला. आता एसआयटीवर विश्वास उरला नाही. पोलिस महासंचालकांनी दुसऱ्या शाखेकडून तपास करावा, अशी मागणी खा. इम्तियाज यांनी केली. येत्या १६ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पोलिसांना चकवा देऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसा घेराव घालतो ते पाहाच, असा इशाराही त्यांनी दिला.

आंदोलनात मुख्य आरोप
-जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी अद्याप आरोपी का नाही?
-अंबादास मानकापेने १४२ कोटींचे कर्ज उचलले तेव्हा विभाग काय करत होता?
-जिल्ह्याभरात पतसंस्थेच्या २८ शाखा विनापरवाना कशा सुरू हाेत्या?
-गुन्ह्यातले फिर्यादी असलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल उशिरा का सादर केला?
-३१ मार्च, २०१९ रोजी एकाच दिवसात चौकशी पूर्ण होऊन त्याच दिवशी ७६ कोटींचे कर्ज कसे उचलले गेले?

राज्यात पतसंस्थेच्या अवस्था
-खा. जलील यांनी सहकार खात्यावर गंभीर आरोप केले. सहकार खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे सांगत राज्यातील त्यांची अवस्था सांगितली.
-राज्यात १३ हजार ४१२ नागरी सहकारी पतसंस्था आहेत.
-७५ हजार ५२८ पगारदार पतसंस्था स्थापन आहेत.
- १ कोटी सभासद.
-यात ११० लाख कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
-शेंद्र्याच्या एकाच १ हेक्टर ४० आर जमिनीवर ८ लोकांनी ४५ कोटींचे कर्ज उचलले. ही बाब कोणाच्या निदर्शनास आली कशी नाही?

Web Title: 'They' let the 'Adarsh' credit bank scammed by bribe; Sensational allegations of depositors against upnibandhak karyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.