...म्हणे औरंगाबाद शहरात तीनपट पाण्याचे स्रोत; जलतज्ज्ञांचा महापालिका आयुक्तांना अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:38 PM2018-10-23T16:38:15+5:302018-10-23T16:43:47+5:30
शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा काही जलतज्ज्ञांनी केला.
औरंगाबाद : शहरात कुठेच पाण्याचा नैसर्गिक स्रोत नसल्याने चार दशकांपूर्वी महापालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करून जायकवाडीहून पाणी आणावे लागत आहे. शहराला जेवढी गरज आज पाण्याची आहे, त्याच्या तीनपट पाणी विविध जलस्रोतातून मिळेल, असा दावा सोमवारी काही जलतज्ज्ञांनी केला. यासंदर्भात अहवालही मनपा आयुक्तांना सादर करण्यात आला असून, यासाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च असल्याचेही सांगण्यात आले आहे.
जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून, शहराला आज जेवढी गरज आहे, त्यापेक्षा तिप्पट पाणी मिळेल. कमी विजेचा वापर करून हे पाणी वापरता येईल, असा दावाही करण्यात आला आहे. खानापूरकर, प्रमोद खैरनार, संजय कापसे, डॉ. अशोक तेजनकर यांनी नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास केला. हर्सूल, सावंगी, सातारा परिसर, चिकलठाणा या चार ठिकाणांहून शहराला ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे.
शहराचा परिसर ६४२ चौरस किलोमीटर एवढा विस्तीर्ण आहे. दरवर्षी ६७२ मिलिमीटर सरासरी पाऊस होतो. यापैकी बाष्पीभवन व इतर कारणांमुळे उपलब्ध न होणारे पाणी वगळले तरी ३०२ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होते. शहर परिसरातील डोंगराळ भागातील पाणी नद्या, नाल्यांद्वारे वाहून जाते. हे पाणी अडविले आणि मुरविल्यास शहराला कमी वीज वापरून पाणी उपलब्ध होऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. सातारा, देवळाई परिसरात २० लहान मोठे तलाव आहेत. हे तलाव दोन-तीन पावसातच भरतात व पाणी वाहून जाते. त्यामुळे तलाव खोल केल्यास ४५ किलोमीटरच्या या पाणलोट क्षेत्रात ११.७ दलघमी पाणी वाढू शकते. ३२ दशलक्ष लिटर पाण्यावर सव्वालाख नागरिकांची तहान भागेल, असे अहवालात म्हटले आहे.
हर्सूल तलावच दरवर्षी कोरडा
मागील दहा वर्षांमध्ये हर्सूल तलाव तुडुंब भरलाच नाही. तलावातील गाळ काढूनही बघितला. त्याचा काहीच फायदा मनपाला झाला नाही. तलावातून मनपाला पूर्वी दररोज ५ एमएलडी पाणी मिळत होते. तलावात पाणीच येत नसल्याने मागील दोन वर्षांपासून उपसाही बंद करण्यात आला आहे.
समांतर जलवाहिनी टाकणे होईना
दहा वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्य शासनाने महापालिकेला जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी १६१ कोटी २० लाख रुपये दिले. त्यावर व्याजच १२७ कोटींचे झाले आहे. आजही मनपाच्या तिजोरीत ३७३ कोटी २६ लाख रुपये पडून आहेत. तरीही समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करता आले नाही.
यापूर्वीही अनेक प्रयोग
जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनीही यापूर्वी अनेकदा मनपाच्या विनंतीवरून शहरातील नैैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा अभ्यास केला. शहराला जेवढ्या पाण्याची गरज आहे, तेवढे पाणी मिळू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले होते. दौलताबाद येथील मोमबत्ता तलावातील पाणी सायफन पद्धतीने पडेगाव, मिटमिटा, छावणी आदी भागातील नागरिकांना देता येऊ शकते, असाही अहवाल मनपाला सादर करण्यात आला होता. नहर-ए-अंबरीच्या पाण्याचा वापर करावा, असाही पर्याय समोर आला होता.