शिवकालीन हेरगिरीची कला ‘ते’ वापरतात पोटासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:42+5:302021-07-26T04:04:42+5:30
लासूरगाव : शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम होते. एखादा संदेश शत्रूला कळू न देता आपल्या सहकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ...
लासूरगाव : शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेर खाते अत्यंत सक्षम होते. एखादा संदेश शत्रूला कळू न देता आपल्या सहकाऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हाताच्या खाणाखुणांचा वापर केला जात असे. आजही अनेक कुटुुंबांना वाडवडिलांपासून आलेली ही कला आत्मसात आहे. मात्र, कालौघात त्यांच्यावर या कलेचा वापर पोटापाण्यासाठी करण्याची वेळ आली आहे. किसन सावळेराम सावंत हे त्यापैकीच एक नाव आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बलाढ्य शक्तींना ज्या गोष्टींच्या भरवशावर मात दिली त्यात अठरापगड जातींची मिळालेली साथ मोलाची होती. सर्वांत महत्त्वाचे कार्य त्याकाळी गुप्तहेर खात्याचे होते. छत्रपतींनी अत्यंत सक्षम अशी गुप्तहेर यंत्रणा उभारून तिच्या भरवशावर अनेक शत्रूंना त्यांनी नामोहरम केले. त्याकाळी गुप्तहेर आपल्या सहकाऱ्यांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी हातांच्या खुणा, विशिष्ट प्रकारचा आवाज यासह अनेक साधनांचा वापर करीत असे. संदेश तर समोरच्यापर्यंत पूर्ण जात असे, मात्र, आजूबाजूच्या लोकांना यातील एक शब्दही समजत नसे. कालांतराने ही कला कमीकमी होत गेली; पण त्यातही काही व्यक्ती आजही आपल्या वाडवडिलांपासून आलेली ही कला मनापासून जपत आहेत. सध्या लासूरगाव परिसरात नगर जिल्ह्यातील किसन सावळेराम सावंत हे मुलगा शुभम याच्यासोबत गावोगाव फिरून ही कला दाखवीत उदरनिर्वाह करीत आहेत.
चौकट
अशी दाखविली जाते कला
या शिवकालीन कलेत किसन सावंत व त्यांचा मुलगा हे दोघे जण संबळ व तुणतुणे घेऊन गावोगावी जातात. यात ते दोघेही एकमेकांपासून काही अंतरावर उभे राहतात. किसन सावंत हे गावातील नागरिकांना नाव विचारतात. ते नाव तोंडातून शब्दही न काढता, हातवारे करून आपल्या मुलाला सांगतात. तो लांबूनच ते नाव ओळखतो. समोरील व्यक्तीने सांगितलेले संपूर्ण नाव कितीही अवघड असले तरी ते ओळखले जाते. याद्वारे नागरिकांनी दिलेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
कोट
शासनाने मदत करावी
या कलेला नव्या रूपाने ओळखण्यात यावे, तसेच नामशेष होऊ नये यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. आमच्या उदरनिर्वाहाचे हे साधन असून, शासनाने मदत करावी. गावोगावी फिरूनही पुरेसे पैसे मिळत नाहीत. मात्र, वडिलोपार्जित असलेली ही कला आम्ही जोपासत आहोत. पुढील पिढीलाही ती हस्तांतरित केली जाईल.
-किसन सावळेराम सावंत, कलाकार
फोटो : शिवकालीन हेरगिरीची कला सादर करताना किसन सावंत व त्यांचा मुलगा शुभम सावंत.
250721\img-20210724-wa0007.jpg
शिवकालीन हेरगिरीची कला जोपासताना किसन सावडीराम सावंत व त्यांचा मुलगा शुभम.