नातेवाईकाच्या घरातून पावणेदोन लाखाचे दागिने पळविणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 05:48 PM2018-10-20T17:48:43+5:302018-10-20T17:49:08+5:30
दागिने चोरून नेणा-या एकाला जवाहरनगर पोलिसांनी श्रीरामपुर येथून पकडून आणले.
औरंगाबाद: नातेवाईक प्राध्यापिकेच्या घरातून पावणे दोन लाखाचे दागिने चोरून नेणा-या एका जणाला जवाहरनगर पोलिसांनी श्रीरामपुर येथून पकडून आणले. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केली. ही चोरी १६ आॅक्टोबर रोजी जवाहरनगर परिसरात घडली होती.
मकरंद कृष्णाजी आहेर (वय ३५, रा.श्रीरामपुर, जि. अहमदनगर)असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जवाहरनगर परिसरातील रहिवासी प्राध्यापिका सुवर्णा पवार यांच्या पतीचा दुरचा नातेवाईक आहे. आरोपी हा १६ आॅक्टोबर रोजी कामानिमित्त औरंगाबादेत आला होता. पाहुणा असल्याने पवार कुटुंबियांनी त्याला त्यांच्या एका बेडरूममध्ये झोपण्यास सांगितले. त्या रूममध्ये त्यांचे कपाट होते. या कपाटाला चावीही तशीच होती. पाहुणाच असल्याने कपाटातील दागिने त्यांनी नेहमीप्रमाणे ठेवले होते.
दुस-या दिवशी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास मकरंद हा गावी परत गेला. गावी जाताना मात्र त्याने पवार यांच्या घरातील प्लायवूड कपाटात ठेवल्या पाच तोळ्याचा हार, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, पाच ग्रॅमचे टॉप्स असा सुमारे पावणे दोन लाखाचे दागिने चोरून नेले. दोन दिवसानंतर त्यांना त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समजले.
पोलिसांत तक्रार प्राप्त होताच जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शारदा वायदंडे, डी.बी. पथकाचे कर्मचारी वानखेडे, अकोले, चव्हाण यांच्या पथकाने श्रीरामपुर येथे जाऊन आरोपीला पकडले. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली देत चूक झाल्याचे मान्य करीत घरात लपवून ठेवलेल दागिने काढून दिले. त्याच्याकडील दागिने जप्त करून पोलीस त्याला औरंगाबादेत घेऊन आले. सहायक निरीक्षक वायदंडे तपास करीत आहेत.