चोरटे झाडावरून बँकेच्या इमारतीवर, शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 06:37 PM2021-03-11T18:37:14+5:302021-03-11T18:38:49+5:30
चोरट्यांना बुलढाणा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
गल्ले बोरगांव ( औरंगाबाद ) : गल्ले बोरगांव येथील ग्रामसचिवालयाच्या इमारतीमधील औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँक व बुलढाणा अर्बन बँक फोडून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांना बुलढाणा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँक व बुलढाणा अर्बन बँकची शाखा गल्ले बोरगांव येथील ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहेत. बुधवारी मध्यरात्री चोरटे पाठीमागील बाजूस असणाऱ्या झाडावरून इमारतीवर आले. त्यानंतर त्यांनी प्रथम बुलढाणा बँकेचे शटर तोडले. आत प्रवेश करून सीसीटीव्हीची केबल तोडली. फर्निचरची नासधूस करत कागदपत्रांची फेकाफेकी केली. नंतर बँकेची तिजोरी ताब्यात घेतली. ती फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना यात यश आले नाही. यामुळे चोरट्यांनी औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकच्या शाखेकडे मोर्चा वळवला. बँकेचे एक कुलूप तोडले मात्र त्यांना दुसरे कुलूप तुटले नाही. यामुळे चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही.
सकाळी ग्रामपंचायतचा सफाई कर्मचारी वरच्या मजल्यावर आला असता त्याला हा प्रकार दिसला. त्याने लागलीच याची माहिती सरपंच आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बँकेतील सर्व रक्कम आणि मुद्देमाल सुरक्षित असल्याची माहिती आहे. तिजोरी न तुटल्याने त्यातील रोख रक्कम आणि तारण दागिने असा लाखोंचा ऐवज वाचला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.