चोर चंदन झाड तोडत होता आणि हतबल घरमालक मोबाईलवर शूटिंग करत होता...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:04 AM2021-05-22T04:04:47+5:302021-05-22T04:04:47+5:30
पुष्पनगरीमधील तीन ते चार चोरटे एका बंगल्याच्या आवारात घुसले. घराच्या आवारातील १५ ते १६ वर्ष चंदनाचे झाड त्यांनी कापायला ...
पुष्पनगरीमधील तीन ते चार चोरटे एका बंगल्याच्या आवारात घुसले. घराच्या आवारातील १५ ते १६ वर्ष चंदनाचे झाड त्यांनी कापायला सुरुवात केली. आवाज ऐकून कुत्र्याने भुंकणे चालू केले. घरमालकही जागे होऊन गॅलरीत आले. घरमालकाने बॅटरीचा प्रकाश चोरट्यांवर टाकला आणि मोबाईल कॅमेरा सुरू केला. पण धीट चोरांनी झाड तोडण्याचे काम थांबवले नाही. घरमालकाने त्यांना ‘ओ दादा कोण आहात तुम्ही, काय करीत आहात’ असे गॅलरीतून विचारू लागले. चोरांनी घरमालकाकडे दुर्लक्ष केले आणि झाड तोडण्यावर लक्ष केंद्रित केले. चोरांनी अवघ्या काही मिनिटात झाड तोडले आणि खोड कापून कंपाउंड वॉलच्या बाहेर फेकले. हे खोड घेऊन चोरटे तेथून निघून गेले. यानंतर घरमालकांनी पोलिसांना फोन केला.
चोर आल्याची कुणकुण लागताच घरमालकाने तत्काळ पोलिसांना कॉल केला असता तर क्रांती चौकातून पाच मिनिटांत पोलीस येऊ शकले असते. नंतर पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांना घरमालकाने मोबाईलवर केलेले चोरट्यांचे चित्रण दाखवले. पोलिसांना कॉल करण्याऐवजी हे महाशय मोबाईलवर शूटिंग का करीत होते असा प्रश्न पोलिसांना पडला. घरमालकाने बनवलेली व्हिडिओ क्लीप शुक्रवारी समाजमाध्यमावर व्हायरल झाली.