बाजारात गर्दी होताच चोरटेही सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:21+5:302021-06-05T04:04:21+5:30
औरंगाबाद: बाजारात खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांच्या पर्स कापून सोन्याच्या पोत चोरट्यांनी पळविल्याच्या दोन घटना रंगारगल्ली आणि सराफा येथे झाल्या. ...
औरंगाबाद: बाजारात खरेदीसाठी गेलेल्या दोन महिलांच्या पर्स कापून सोन्याच्या पोत चोरट्यांनी पळविल्याच्या दोन घटना रंगारगल्ली आणि सराफा येथे झाल्या. तर तिसऱ्या घटनेत दुकानदार दान वाटप करीत आहे, असे खोटे सांगून एकाने वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत लंपास केल्याची घटना अंगुरीबागेत घडली. या सर्व चोऱ्या शुक्रवारी दुपारी १२ ते २ या कालावधीत झाल्या. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात नोंद करण्यात आली.
१ जूनपासून अंशतः लॉकडाऊनमुळे बाजारात नागरिक गर्दी करीत आहेत. हे पाहून चोरटेही सक्रिय झाले आहेत. बारी कॉलनीतील रहिवासी शमीम बेगम कैसर खान (५०) यांनी आज दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास सराफातील अलमास ज्वेलर्स या दुकानात २७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची पोत बनविली. दुकानदाराने दिलेल्या पिशवीत पोत ठेवून त्या लहान मुलाची टोपी खरेदी करण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेल्या. यावेळी टोपी वाल्याला पैसे देण्यासाठी पिशवीत हात घातला असता पिशवी तीन ठिकाणी ब्लेड मारून कापल्याचे आणि त्यातील त्यांची पोत चोरी झाल्याचे दिसले. या घटनेनंतर त्यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत रंगारगल्लीत एका महिलेच्या पर्सला ब्लेड मारून त्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले. तर अंगुरी बागेत पायी जाणाऱ्या वृद्ध महिलेला अनोळखी भामट्याने गाठून पुढे एक दुकानदार दान वाटप करीत आहे. चला तुम्हाला ते दुकान दाखवतो असे म्हणून त्याने महिलेला काही अंतर चालत नेले आणि उभे केले. यादरम्यान त्याने त्यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची सोन्याची पोत चोरून नेली. त्यांना तेथेच उभे करून चोरटा पसार झाला. सुमारे अर्धा तासानंतर त्यांना गळ्यातील पोत चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपास सुरू केला.