सोयगावात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:32+5:302021-06-03T04:04:32+5:30
सोयगाव : शहर गाढ झोपेत असताना, अज्ञात चोरट्यांनी बस स्थानक परिसरात धुमाकूळ घातला. एकाच रांगेत असलेल्या तब्बल सात दुकानांचे ...
सोयगाव : शहर गाढ झोपेत असताना, अज्ञात चोरट्यांनी बस स्थानक परिसरात धुमाकूळ घातला. एकाच रांगेत असलेल्या तब्बल सात दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी हजारो रुपयांचे साहित्य लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. अनलॉकच्या पहिल्याच रात्रीत घडलेल्या या प्रकाराने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी व्यापारी संघाकडून केली जात आहे.
बस स्थानक परिसरात एकाच रांगेत असलेल्या सात दुकानांचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. गेल्या दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमळे दुकानांमध्ये रोख रक्कम आढळून आली नाही. त्यामुळे एका मागे एक अशी दुकाने फोडत, मिळेल ती रक्कम लंपास करण्याचा थरारक प्रकार बस स्थानक परिसरात घडला आहे, तर काही दुकानांमधून चोरट्यांनी साहित्य लंपास केल्याचे उघडकीस आले. एका दुकानातून सहा हजारांची रोख रक्कम मिळाली आहे, तर मोबाइल शॉपी, किराणा दुकान, बूट हाऊस, हॉटेल्स, जनरल स्टोअर्स, कृषी केंद्रे सात दुकाने फो़डली. या प्रकरणी बूट हाऊसचे मालक राजू कडूबा बागूल (३१) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष पाईकराव, शिवदास गोपाल, संदीप चव्हाण, सागर गायकवाड, अविनाश बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
----
यांच्या दुकानात झाली चोरी
डेअरी चालक गोकुळ परदेशी, किराणा दुकान मालक अमोल बोडखे, हार्डवेअर दुकानाचे मालक निकेश बिर्ला, किराणा दुकानमालक अभय कोटेचा, फर्निचर दुकान मालक अमोल मांडावे, मोबाइल शॉपी अनिस पठाण यांच्या दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी पंचनामा करून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी औरंगाबाद येथून डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले होते.
----
व्यापाऱ्यांनी केली गस्त वाढविण्याची मागणी
आधीच कोरोना संसर्गाच्या कचाट्यात सापडलेल्या व्यापाऱ्यांना महिनाभरापासून दुकाने बंद करून ठेवावी लागली. मात्र, अनलॉकच्या पहिल्याच दिवशी चोरीच्या घटनेला तोंड द्यावे. व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी व्यापारी संघटनेचे तालुका सचिव प्रमोद रावणे यांनी केली.
----
फोटो : शहरातील बूट हाऊसचे तोडलेले कुलूप, किराणा दुकानाचे तोडलेले शटर व इतर दुकाने.
020621\ynsakal75-0653465346_1.jpg
सोयगाव बसस्थानक परिसरात दुकानांचे कुलूपतोडून चोरी करण्यात आली.