दोन बँका लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:07+5:302021-03-13T04:05:07+5:30
गल्ले बोरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दोन बँका लुटण्याचा चोरट्यांचा डाव फसला आहे. मात्र, दोन्ही बँकेचे ...
गल्ले बोरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या दोन बँका लुटण्याचा चोरट्यांचा डाव फसला आहे. मात्र, दोन्ही बँकेचे चोरट्यांनी नुकसान केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेने मात्र, गल्ले बोरगावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गल्ले बोरगाव येथील ग्रामपंचायत इमारतीच्या वरच्या मजल्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व एक खाजगी बँक समोरासमोर आहे. या दोन्ही बँकांच्या समोर एक सुरक्षारक्षक तैनात असतो; परंतु बुधवारी रात्री अकरा वाजेनंतर तो घरी गेला. त्यानंतर चोरट्यांनी मध्यरात्री दोन्ही बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले; परंतु आतमधल्या दरवाज्याचे कुलूप तुटले नाही. त्यामुळे चोरट्यांनी समोरच असलेल्या खाजगी बँकेकडे मोर्चा वळविला. त्या बँकेच्या शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. कॅमेरा तोडून, ड्राॅवर व इतर साहित्याची तोडफोड केली. तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून त्यांनी सीसीटीव्हीची हार्डडिस्क काढून ग्रामपंचायत कार्यालयाच्या गच्चीवर फेकून दिली. हाती काहीच लागत नसल्याने चोरट्यांनी अखेर पळ काढला. मात्र, यामुळे दोन्ही बँकांचे नुकसान झाले आहे.
सकाळी ग्रा.पं. शिपाई ज्ञानेश्वर शिरसाट साफसफाईसाठी आले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी याबाबत सररपंचांना माहिती दिली. खुलताबाद पोलीस ठाण्याला ही कळविण्यात आले. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, सपोनि दिनेश जाधव, बीट अंमलदार वाल्मीक कांबळे, पोलीस पाटील सिंधू बढे, सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकारामुळे गल्ले बोरगाव परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. खाजगी बँकेचे व्यवस्थापक संजय देशपांडे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. श्वान पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली, तर ठसे तज्ज्ञांच्या पथकाने देखील तपास सुरू केला आहे.
----
दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न
मध्यवर्ती बँकेला सुरक्षारक्षक नसल्याने यापूर्वीदेखील या बँकेत चोरी झाली होती. त्यानंतर सुरक्षा म्हणून बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्ताने बँकेला सुटी राहणार असल्याने बुधवारी बँकेत दिवसभर ग्राहकांची गर्दी होती. येथे गल्ले बोरगावसह दहा गावांचा कारभार येथून चालतो. चोरीच्या दोन घटना घडून देखील बँक व्यवस्थापनाकडून येथे सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलली जात नसल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात होते.