चोरट्यांनी तीन दुकाने फोडली; हाती लागली ७०० रुपयांची चिल्लर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 02:54 PM2022-03-03T14:54:25+5:302022-03-03T14:55:10+5:30
एकामागून एक अशी तीन दुकाने फोडल्यानंतरही जेमतेम ७०० रुपयांची चिल्लरच चोरट्यांच्या हाती लागली.
औरंगाबाद : सातारा परिसरातील आयप्पा मंदिर रस्त्यावरील तीन दुकानांचे शटर उचकटून १००, २०० आणि ५०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी पळविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.
सातारा परिसरातील आयप्पा मंदिर रस्त्यावर असलेल्या दोन किराणा आणि एका सौंदर्यप्रसाधन दुकानाचे शटर चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या मालकांनी चिल्लर वगळता उर्वरित पैसे गल्ल्यामध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे चोरट्यांच्या हातात जास्त काही लागले नाही. सई किड्स ॲण्ड लेडीज वेअर, मातोश्री किराणा आणि न्यू आराध्ये किराणा या तीन दुकानांमध्ये चोरी झाल्याची माहिती सातारा पोलिसांनी दिली. चोरट्यांनी दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. मात्र, किराणा सामान आणि चिल्लरशिवाय काहीही नसल्यामुळे चोरट्यांचाही हिरमोड झाला असावा.
एकामागून एक अशी तीन दुकाने फोडल्यानंतरही जेमतेम ७०० रुपयांची चिल्लरच चोरट्यांच्या हाती लागली. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. या घटनांमुळे परिसरातील व्यापारी, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सातारा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.
इटखेड्यात घरफोडी
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इटखेडा परिसरात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना १८ फेब्रुवारीला घडली होती. याप्रकरणी २ मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. संदीप विठ्ठल बनकर (रा. गट नंबर १६, नाथनगर, वैतागवाडी, इटखेडा) हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तेव्हा चोरट्याने घरातील ६२ हजार ८० रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते.