चोराचा असाही ‘प्रामाणिकपणा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:41 AM2018-04-03T00:41:39+5:302018-04-03T16:03:15+5:30
पैठणमधील आश्चर्यकारक घटना : घरातून चोरलेले साडेपाच लाख रुपये आणून टाकले
पैठण : सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाच्या घरातून चोरीस गेलेले तब्बल पाच लाख ४८ हजार रुपये १५ दिवसानंतर चोरट्यांनी पुन्हा घरात आणून टाकल्याची घटना पैठण शहरात घडली.
या घटनेत एवढी मोठी रक्कम कुणी चोरली व ती रक्कम परत घरात आणून कुणी टाकली, हे अद्याप समोर आले नाही. सदरील रक्कम बँक व्यवस्थापकाच्या सालगड्याची होती. ती त्यांनी व्यवस्थांपकांकडे ठेवली होती. पुढे ती चोरीस गेली व पंधरा दिवसानंतर परत आली. या घटनाक्रमाने पोलीस बुचकळ्यात पडले आहेत. मुद्देमाल वसूल झाली असली तरी चोरी कुणी केली याचा तपास मात्र पोलिसांनी सुरू ठेवला असून लवकरच रक्कम चोर समोर येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी व्यक्त केला.
२३ मार्च रोजी सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक भीमराव रंगनाथ गोरे (रा. रामनगर पैठण) यांनी घरात ठेवलेली ५ लाख ४८ हजार एवढी रक्कम चोरीस गेल्याचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला. या अर्जात गोरे यांनी सदरील रक्कम त्यांचे शेतातील गडी मच्छिंद्र कदम (रा. आनंदपूर ता. पैठण) यांच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. मच्छिंद्र कदम यांना शेती विकत घ्यायची होती, परंतु सौदा तुटल्याने कदम यांनी रक्कम गोरे यांच्या घरीच ठेवली. सदरील रक्कम १५ ते २१ मार्च दरम्यान चोरीस गेली. याबाबत गोरे यांच्या घरात फर्निचरचे काम करणाऱ्या दोन कारागिरावर संशय व्यक्त केला होता.
पोलीस ठाण्यात गोरे यांनी अर्ज दिल्यानंतर पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी अर्ज चौकशीसाठी ठेवून गतीने तपास सुरू केला. फर्निचरचे काम करणाºया कारागिरांनी चोरी केली नाही, हे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादीच्या घराची झडती घेतली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच ३१ मार्च रोजी रक्कम चोरट्यांनी घरात आणून टाकल्याची खबर गोरे यांनी पोलीस निरीक्षक इमले यांना दिली.
पोलीसही आश्चर्यचकीत
चोरलेले ५ लाख ४८ हजार रुपये एक रूपया खर्च न करता जसेच्या तसे पुन्हा घरात आणून टाकण्याची उपरती चोरट्यांना कशी झाली, या विचाराने सध्या पोलीस आश्चर्यचकीत झाले आहेत. मुद्देमाल परत मिळाला असला तरी चोर कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. या प्रश्नावर पोलीस निरीक्षक इमले यांचे पथक सध्या काम करत असून या घटनेतील चोराचा चेहरा समोर येईल, असा विश्वास या पथकास आहे. दरम्यान, चोरीस गेलेले पाच लाख ४८ हजार रूपये चोराने परत आणून दिले, या घटनेची चर्चा शहरात मात्र जोरदार होत आहे.