मंगल कार्यालयांतील चोऱ्यांचा पर्दाफाश; म्हातारी निघाली चोरांच्या टोळीची ‘म्होरकी’!
By सुमित डोळे | Published: December 12, 2023 01:32 PM2023-12-12T13:32:23+5:302023-12-12T13:35:22+5:30
२० किमी पाठलाग करून गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; म्हातारीसह सुनेचा भाऊ, पुतण्या आणि नातवाला अटक तर मुलगा फरार
छत्रपती संभाजीनगर : पुतण्या, मुलगा व आठ वर्षांच्या नातवंडासह मध्य प्रदेशातील ६३ वर्षीय रामबाई हरगोविंदसिंग सिसोदिया ही मंगल कार्यालयात चोऱ्या करणाऱ्या टोळीचे नेतृत्व करत होती. ३ डिसेंबर रोजी हॉटेल रामा इंटरनॅशनल व औरंगाबाद जिमखान्यात चोरी करून सोलापूर, लातूरमध्ये प्रयत्न केला. पुन्हा शहरात येऊन बीडला जात असताना पाचोड परिसरात गुन्हे शाखेने या टोळीच्या मुसक्या आवळल्या. रामबाईसोबत सुनेचा भाऊ सोनू रम्मो सिसोदिया (२५), पुतण्या आशिष बलराम सिसोदिया (३४) व नातवाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलगा गौतम मात्र पोलिसांसोबतच्या झटापटीत निसटला.
३ डिसेंबर रोजी जिमखाना क्लबमध्ये सुनील जैस्वाल यांच्या पत्नीची ५ लाख २५ हजारांच्या दागिन्यांची बॅग चोरीला गेली. दोन तासांनी हॉटेल रामा इंटरनॅशनलमधून दीपक कदमबांडे यांच्या भाच्याच्या लग्नातून साडेतीन लाख रुपये असलेले बॅग चोरीस गेली. ९ डिसेंबरपर्यंत शहरात लग्न समारंभातून चोरीच्या ६ घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक संदीप सोळंके यांना ही टोळी रविवारी शहरातून बीडकडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. अंमलदार नवनाथ खांडेकर, सुनील बेलकर, नितीन देशमुख, मनोहर गिते, श्याम आढे यांनी पाठलाग सुरू केला.
२२ किमी पाठलाग
रामबाई व तिचे कुटुंब चोरीसाठी ३० नोव्हेंबर रोजी आय-२० कार घेऊन निघाले हाेते. शहरानंतर त्यांनी सोलापूर, लातुरात चोरीचा प्रयत्न करून ते पुन्हा शहरात आले. रविवारी बीडच्या दिशेने निघाले. सोळंके यांचे पथक पाठलाग करत होते. दाभरूळ फाट्याजवळ चहा, नाश्त्यासाठी थांबताच पथकाने त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची चांगलीच झटापट झाली. यात ८ वर्षाच्या मुलासह तिघे हाती लागले. पण, गौतम पळाला. कारमध्ये लग्नात जाण्यासाठीचे कपडे, स्वयंपाकाचे साहित्य होते.
ऐवज गेला लाखोंचा, सापडला हजारोंचाच
दोन्ही लग्नातून मोठा ऐवज गेला. मात्र, टोळीकडे केवळ रामा इंटरनॅशनलचे ५० हजार, तर जिमखान्यातून गेलेले अवघ्या ५ हजारांचे दागिने आढळले. त्याआधी अयोध्या मैदानावर स्वयंपाक केला. त्यानंतर शहरात फिरून लॉन, कार्यालयांची रेकी केली. संशय येईल अशा ठिकाणी ते मुक्काम टाळत होते.