खामगा, सुरतगाव, कुंभेफळ येथे चोऱ्या
By Admin | Published: February 21, 2017 10:57 PM2017-02-21T22:57:45+5:302017-02-21T22:59:15+5:30
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७४ हजाराचा ऐवज लंपास केला़
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७४ हजाराचा ऐवज लंपास केला़ तर परंडा तालुक्यातील साकत (बु़) शिवारात घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख ४० हजाराचा ऐवज लंपास केला़ तर उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव शिवारातील मोबाईल शॉपी फोडून ४२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला़ या घटना १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील ज्योतीराम भागवत गुंड हे सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून शेतात कामाला गेले होते़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी पेटी व सुटकेस मध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ७४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली़ या प्रकरणी भागवत गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि एम़टीक़ांबळे करीत आहेत़
परंडा तालुक्यातील तालुक्यातील साकत (बु़) शिवारातील शेतवस्तीवर बळीराम धर्मा आवाळे यांचे घर आहे़ सोमवारी सकाळी शेतातील काम करण्यासाठी बळीराम आवाळे व त्यांच्याव घरातील सदस्य गेले होते़ दुपारच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख २५ हजार रूपये व सोन्याचे दागिने असा तब्बल एक लाख ४० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ याबाबत बळीराम आवाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि वाघमोडे हे करीत आहेत़
उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथील रत्नदीप नागनाथ शिनगारे यांचे उस्मानाबाद- तडवळा मार्गावर मोबाईल शॉप आहे़ १८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मोबाईल शॉपीचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ दुकानातील तीन मोबाईल, एक युपीएस, दोन लहान साऊंड, ३० मोबाईल चार्जर, २५ बॅटऱ्या, मोबाईल रिंगर यासह रोख १२ हजार रूपये असा जवळपास ४२ हजार ४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत रत्नदीप नागनाथ शिनगारे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ कदम हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)