पोलिसांनी साप निघाल्याचे सांगून सर्पमित्रास बोलावले; ३ लाखांच्या बिड्या चोरीचा झाला उलगडा
By राम शिनगारे | Published: October 6, 2022 06:07 PM2022-10-06T18:07:24+5:302022-10-06T18:07:56+5:30
बिड्यांचे बॉक्स चोरणाऱ्या पाच आरोपींना बेड्या; सीसीटीव्ही नसल्यामुळे खबऱ्याच्या माहितीची उपयोग
औरंगाबाद : मोंढा नाका परिसरातील एका होलसेल बिडी विक्रेत्याच्या गोडाऊनमधुन तीन लाख कोंबडा बिड्या असलेले तब्बल १५ कार्टन एका चारचाकी वाहनात टाकून चोरी करणाऱ्या पाच जणांना क्रांतीचौक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयात आरोपींना हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिली.
व्यापारी अनुज ओमप्रकाश अग्रवाल (रा. दिवाण देवडी) यांचे माेंढा परिसरात बालाजी इंटरप्राईजेस नावाचे होलसेल बिडी विक्रीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये ४ ऑक्टोंबरच्या रात्री पाच चोरटयांनी गोडाऊन फोडून तीन लाख बिड्या असणारे एकुण १५ कार्टनसह संगणकाचा सीपीयू असा ऐवज चोरुन नेला. एका कार्टनमध्ये तब्बल ४० पुडे असतात. प्रत्येक पुढ्यात ५०० बिड्या असतात. त्यामुळे हा चोरीचा मुद्देमाल घेऊन जाण्यासाठी चोरट्यांनी छोटा हत्तीचा वापर केला.
निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनात विशेष तपास पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके, हवालदार संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, मंगेश पवार, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, कृष्णा चौधरी आणि मंगेश कोळी यांची तपास पथके नेमली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे खबऱ्यांमार्फत आरोपींची माहिती घेतल्यानंतर सोमनाथ रमशे उने, अविनाश बाबुराव जगताप, (दोघे रा. जुना मोंढा, रोहिदासपुरा), फारुख शहा चांद शहा (रा. हरीराम नगर, बीडबायपास), अन्वर रशिद पठाण (रा. कटकटगेट ) आणि सुयोग उर्फ सोनु संतोष जाधव (रा.रमानगर, ग.नं.३, उस्मानपुरा) या पाच जणांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सर्वांनाच चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. तसेच बिडीचे १४ कार्टन , संगक सीपीयूसह गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती, एक दुचाकी असा एकुण ४ लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचेही डॉ. दराडे यांनी सांगितले.
साप निघाल्याचे सांगून बोलावले
खबऱ्यामार्फत आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यात सोमनाथ उणे हा संर्पमित्र होता. त्यास घरात साप निघाल्याचे सांगून दिवाण देवडी परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्यास ठाण्यात आणून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीतील सोमनाथ आणि अविनाश हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.