पोलिसांच्या धाडसा पुढे चोरट्यांचा नाईलाज;मध्यरात्री थरारक पाठलागानंतर चोरटे कार सोडून फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:58 PM2023-05-04T18:58:03+5:302023-05-04T18:58:54+5:30
अर्धातास पाठलाग करून चोरट्यांची कार पोलिसांनी पकडली; कारमध्ये बोगस नंबर प्लेट आढळून आल्या आहेत
पैठण : जनावरे चोरण्यासाठी कारने पैठण शहरात आलेल्या चोरट्यांना पोलिसांनी हटकले. त्यानंतर चोरट्यांनी शेवगावच्या दिशेने धुम ठोकली. मात्र, पोलीसांनी चोरट्यांच्या कारचा पाठलाग केला. चोरटे पुढे तर पोलीस मागे असा वेगवान थरार पैठण-शेवगाव रोडवर बुधवारी मध्यरात्री अर्धातास सुरू होता. पोलीस पाठ सोडणार नाही याची जाणीव झाल्याने चोरटे शेवगाव तालुक्यातील तळणी येथे कार सोडून अंधारात फरार झाले.
पोलिसांनी कार जप्त करून ठाण्यात आणली, कारमध्ये दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळून आल्या. पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी पैठण पोलीसांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली... पाचोड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे हे विभागीय गस्तीवर असताना त्यांना बुधवारी मध्यरात्री दोन वाजता पैठण शहरातील इंदिरानगर भागात एक कार व दोन चोरटे जनावराजवळ उभे असलेले आढळून आले. पोलीसांची जीप पाहताच चोरटे घाईघाईने कारमध्ये बसून सूसाट निघाले.
पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांनी जीप चोरट्यांच्या कारमागे लावली. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच मार्ग बदलत दिशाभूल करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु पोलीस मागे हटलेच नाही. पाठलाग सुरू असताना उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी याबाबत कंट्रोल रुमला माहिती दिली. कंट्रोलने लगेच पैठण पोलिसांना सतर्क केले.
पैठण शहरात गस्तीवर असलेले पैठण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, चालक कल्याण ढाकणे, शेख नुसरत यांनी त्यांची जीप पैठण -शेवगाव रोडवर वळविली. दोन पोलीसांच्या गाड्या चोरट्यांच्या कारचा पाठलाग करत होत्या.. शेवगाव पोलीसांनी शेवगाव येथे नाकाबंदी करून ठेवली होती. अर्धा तास पोलीसांचा पाठलाग सुरू असल्याने हिंमत खचलेल्या चोरट्यांनी तळणी ( ता. शेवगाव जि अहमदनगर ) या गावाच्या एक किलोमीटर अलीकडे कार सोडून पळ काढला.
पोलिसांनी चोरट्यांची कार ( एम एच २० बी एन ३८८३) ताब्यात घेतली. कार मध्ये पोलिसांना दोन बनावट नंबर प्लेट आढळून आल्या. पैठण पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती लहाने पुढील तपास करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी हिंमत न हारता दुसऱ्या जिल्ह्यात ( अहमदनगर ) जात चोरट्यांचा पाठलाग केला. सुतळे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे पैठण शहरातील चोरीची घटना टळली. व चोरट्यांना पळता भुई थोडी झाली. सुशांत सुतळे यांच्या धाडसाचे पैठणकर कौतुक करत आहेत.