अमेरिकेला गेलेल्या कुटुंबाचा बंगला चोरट्यांनी फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 07:19 PM2019-08-17T19:19:25+5:302019-08-17T19:21:17+5:30
बंगल्याच्या मुख्य दाराचा कडी-कोंडा तोडून चोरटे आत गेले.
औरंगाबाद : मुलाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या कुटुंबाचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सिडको एन-१ येथे नगिन भागचंद संगवी हे पत्नी आणि मुलीसह राहतात. त्यांचा मोठा मुलगा व्यवसायानिमित्त अमेरिकेत तर दुसरा मुलगा मुंबईत स्थायिक आहे. मुलाला भेटण्यासाठी संगवी दाम्पत्य मुलीसह २८ जुलै रोजी अमेरिकेत गेले आहे. बंगल्याच्या देखरेखीसाठी त्यांनी भाईदास रामदास कदम यांना नेमले होते. भाईदास हे त्यांना वेळ मिळेल तेव्हा बंगल्यात जात आणि दोन-तीन तास थांबून त्यांच्या घरी परतत. नेहमीप्रमाणे भाईदास हे शुक्रवारी दुपारी संगवी यांच्या निवासस्थानी गेले होते. तेथे काही वेळ थांबल्यानंतर दुपारी अडिच वाजेच्या सुमारास बंगल्याला कुलूप लावून ते घरी गेले. यानंतर चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य गेटचे कु लूप जैसे थे ठेवून कम्पाऊंड वॉलवरून उड्या मारून आत प्रवेश केला.
बंगल्याच्या मुख्य दाराचा कडी-कोंडा तोडून चोरटे आत गेले. समोरच्या बैठक खोलीतील देव्हाऱ्यातील देव अथवा चांदीच्या वस्तूंना त्यांना हात लावला नाही. यानंतर चोरट्यांनी आतील मुख्य बेडरूमचा कडी कोंडा उचक टून प्रवेश केला. या खोलीतील दोन कपाटातील सोन्याच्या चार ते पाच अंगठी आणि रोख सुमारे २५ हजार रुपये चोरले. तेथे पडलेल्या चाव्यांच्या गुच्छा चोरट्यांनी उचलला आणि ते वरच्या मजल्यावरील संगवी यांच्या मुलीच्या खोलीकडे गेले. हातातील चाव्यांच्या गुच्छातील चावी लावून त्यांनी खोलीचे कुलूप उघडले. आतमधील कपाटात ठेवलेली सोन्याची चेन आणि रोख सुमारे ७० हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागले. खोलीतील अन्य सामानही अस्ताव्यस्त फेकले. यानंतर चोरट्यांनी शेजारील अन्य खोलीचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. या खोलीतील कपाटात मौल्यवान वस्तू अथवा दागिन्यांचा शोध घेत चोरट्यांनी सामान, कपडे इकडे तिकडे फेकले. शिवाय स्वयंपाक खोलीतील ड्रावर चोरट्यांनी उचकटवले, मात्र यात त्यांना काही मिळाले नाही.
दाराचा कोंडा तुटलेला दिसताच कळविले पोलिसांना
भाईदास हे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संगवी यांच्या बंगल्यात गेले तेव्हा त्यांना मुख्य दाराचा कोंडा तुटलेला दिसला. याघटनेची माहिती त्यांनी प्रथम संगवी यांच्या बहिणीला आणि पोलिसांना कळविली.