संभाजी कॉलनीत उघड्या घरातून चोरट्यांनी पळविले सहा तोळ्यांचे दागिने, ३३ हजारांची रोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:04 AM2021-05-08T04:04:46+5:302021-05-08T04:04:46+5:30
औरंगाबाद : सिडको एन-६, संभाजी कॉलनीतील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी अवघ्या अर्ध्या तासात सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ...
औरंगाबाद : सिडको एन-६, संभाजी कॉलनीतील उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी अवघ्या अर्ध्या तासात सहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ३३ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना २७ एप्रिल रोजी रात्री ११ ते ११.३० वाजेदरम्यान घडली.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार सुधीर भानुदास खताळ हे सिडकोतील एका शाळेत लिपिक आहेत. संभाजी कॉलनीत ते सहपरिवार राहतात. २७ एप्रिलच्या रात्री जेवण झाल्यावर १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा प्रसाद हा तक्रारदार यांच्या नातीला घेऊन बाहेर गेला होता, तर सून भांडी घासत होती. तक्रारदार आणि त्यांची पत्नी घराच्या पहिल्या मजल्यावर होते. ११ वाजेच्या सुमारास तक्रारदारांची सून घराचे गेट आणि दार उघडे ठेवून पतीला बोलावून मुलीला आणण्यासाठी गेली. ११.३० वाजेच्या सुमारास प्रसाद घरी आला तेव्हा त्याला घरातील कपाटातील साड्या आणि अन्य वस्तू अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दीड तोळ्याचे मिनी गंठण, ६ ग्रॅमचे झुमके, २० ग्रॅमचे सोन्याचे लॉकेट, ४ आणि ५ ग्रॅमच्या सोन्याच्या २ अंगठ्या, १० ग्रॅमचे झुंबर, १ ग्रॅमची पोत, कर्णफुले आणि रोख ३३ हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्यांनी तातडीने सिडको पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.