दिवाळीपूर्वीच चोरट्यांचा धुमाकूळ: ११ तोळे सोन्यासह रोख रक्कम चोरी
By राम शिनगारे | Published: November 5, 2023 07:45 PM2023-11-05T19:45:37+5:302023-11-05T19:45:49+5:30
पुंडलिकनगर, छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीपूर्वीच चोरट्यांनी शहरात दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन घरातून चोरट्यांनी ११ तोळे सोन्याच्या दागिन्यासह १२ हजार राेख रक्कम लंपास केली, तर छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन दुकाने फोडल्याची घटना मागील २४ तासांमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.
पहिली घटना हनुमाननगर, गारखेडा परिसरात ३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. फिर्यादी महिला दुपारी घराला कडी लावून गणेशनगर येथे ब्युटी पार्लरसाठी गेल्यानंतर चोरटे त्यांच्या दरवाजाची कडी उघडून आत घुसले. कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची मण्याची पाेत, एक तोळ्याचे नेकलेस, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या आणि एक ग्रॅम सोन्याची नथ, असा एकूण ६६ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दुसरी घटना पारिजातनगरातील प्रभाकर गणपतराव पवार यांच्या घरात ४ नोव्हेंबरच्या रात्री १२ ते २ वाजेच्या दरम्यान घडली.
पवार यांच्या घरातून चोरट्यांनी अडीच तोळे सोन्याची पोत, एक तोळ्याची अंगठी, ९ ग्रॅम सोन्याचे कानातील रिंग आणि रोख २ हजार रुपये चोरून नेले. तिसरी घटना पारिजातनगर येथीलच सुयोग शरदचंद्र सांबरे यांच्या घरात घडली. त्यांच्या घरातून चोरट्यांनी १० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ऐन दिवाळीच्या तोंडावरच शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे घटनांवरून समोर आले आहे.
पडेगावात तीन दुकाने फोडली
पडेगावातील मीरानगर येथील तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. फिर्यादी कुंतीलाल अंबादास हिरण (जैन) यांचे जैन मिश्री ट्रेडिंग नावाच्या दुकानाचे शटर उचकटून ५ हजार रुपयांचे चिल्लर नाणे, ५ हजारांच्या नोटा, ५ हजारांचे दहा लिटर गोवर्धन तुपासह एकूण १८ हजारांचा माल लंपास केला. त्यांच्या दुकानाच्या शेजारील विमल भाऊसाहेब साळुंखे यांच्या कौशल्य कलेक्शनचे शटर उचकटून आतील १५०० रुपयांचे चिल्लर, १५ हजारांच्या नवीन २५ साड्या, ६ हजारांचे कपडे, असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा आणि राहुल अशोक दुशिंग यांचे सुंदर मेडिकल फोडून २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी छावणीत गुन्हा नोंदविला.
पर्यटकाचा मोबाइल लांबविला
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट फन्डामेंटल रिसर्च संस्थेतील प्रशासकीय अधिकारी तेजन तुषार शेट्टे या मैत्रिणीसह मुंबईहून देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. खुलताबादला जाण्यासाठी निघाल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात हॉटेल न्यू भारती हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबल्या. तेव्हा त्यांनी एक पशवी शेजारच्या खुर्चीवर ठेवली होती. तेथून एका महिलेने ती पिशवीच लंपास केली. त्यात २० हजार रुपये रोख रकमेसह दोन मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे, असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांकडून रात्रीचा गस्त होईना
दसऱ्यानंतर दिवाळी महोत्सवाला सुरुवात होत आहे. शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना रात्री पोलिसांची गस्त होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांना ठरवून दिलेल्या ठिकाणी गस्त न घालता एकाच ठिकाणी थांबून असतात. त्यामुळे चोरट्यांची दिवाळी होत असल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन दिवाळी गस्त व्यवस्थितपणे झाली नाही तर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.