छत्रपती संभाजीनगरच्या महाशांतता रॅलीत तीन जणांच्या सोनसाखळ्या चोरट्यांनी पळविल्या
By बापू सोळुंके | Published: July 15, 2024 12:14 PM2024-07-15T12:14:35+5:302024-07-15T12:15:11+5:30
तीन संशयित चोरट्यांना लोकांनी पकडून दिले पोलिसांच्या हवाली
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शनिवारी झालेल्या महाशांतता रॅलीमध्ये चाेरट्यांनी चार जणांच्या सोनसाखळ्या लंपास केल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी केम्ब्रिज चौकात तीन चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
शेख परवेज, प्रमोद भालचंद्र थुने आणि जुबेर हसीन पठाण (सर्व रा. मिसरवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. केम्ब्रिज चौकात जरांगे यांचे आगमन झाले तेव्हा तेथे त्यांच्या स्वागतासाठी गर्दी होती. यावेळी देवळाई येथील रावबहादूर हरकळ उपस्थित होते. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सात तोळ्यांची सोन्याची चेन पॅण्डलसह चोरट्यांनी चोरली. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या मागे- मागे राहिलेल्या तीन संशयितांना त्यांनी आणि उपस्थित लोकांनी पकडले व तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले.
अन्य दोन घटना आकाशवाणी सिग्नल चौकात घडल्या. तक्रारदार योगेश पुरुषोत्तम ठाकरे हे महाशांतता रॅलीत सहभागी झाले होते. रॅली सायंकाळी आकाशवाणी चौकात पोहोचली, तेव्हा गर्दीत संधी साधून चोरट्यांनी योगेश यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम १० मिलीची सोनसाखळी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली, मात्र गर्दीचा फायदा उठवत चोरटे पसार झाले. त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. तिसऱ्या घटनेत नागेश यशवंत बिचारे हे सायंकाळी साडेसहा वाजता आकाशवाणी चौकात रॅलीत सहभागी झाले. यावेळी गर्दीत घुसलेल्या चोरट्यांनी संधी साधून बिचारे यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांची सोनसाखळी चोरून नेली. याविषयी त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तिन्ही घटनांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)नुसार गुन्हा नोंदविला. पोलिस हवालदार संदीप जमदाडे तपास करीत आहेत.