जबरी चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस
By Admin | Published: May 17, 2017 12:35 AM2017-05-17T00:35:14+5:302017-05-17T00:43:38+5:30
जालना : घरफोडीसह जबरी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घरफोडीसह जबरी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांकडून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने, असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संशयितांची शोधमोहीम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतली आहे.
गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहागड येथील घरफोडी व जबरी चोरीतील संशयित पुणे व सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. प्राप्त माहिती आधारे गुन्हे शाखेचे
एक पथक सोलापूरला पाठविण्यात आले. पथकाने अकलूज (जि. सोलापूर) येथील वडार वस्तीवरून संशयित विजय सर्जेराव जाधव (वय २३) व रमेश अण्णा शिंदे (वय २४, दोघे, रा. मंगरूळ) यांना ताब्यात घेतले.
जालना येथे आणल्यानंतर चौकशीत त्यांनी जालना व पुणे जिल्ह्यासह तेलंगना, कर्नाटक राज्यात घरफोडीचे विविध गुन्हे केल्याची कबुली दिली. जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यातील एक, कदीम जालना ठाण्यातील चार, तालुका ठाण्यातील दोन चंदनझिरा ठाण्यातील एक, अंबड ठाण्यातील एक, घनसावंगी ठाण्यातील एक आणि गोंदी ठाण्यातील तीन, अशा तेरा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे व अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, कर्मचारी सुरेश गिते, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, भालचंद्र गिरी, सदाशिव राठोड, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके यांनी ही कारवाई केली.