वॉचमनला बांधून ठेवत चोरट्यांनी कंपनीतील साडेबारा लाखांचे साहित्य केले लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 20:22 IST2025-03-11T20:22:05+5:302025-03-11T20:22:23+5:30
गुन्हा करताना चोरट्यांनी कोणतेही पुरावे मागे राहू नयेत म्हणून वॉचमनचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा सोबत नेली.

वॉचमनला बांधून ठेवत चोरट्यांनी कंपनीतील साडेबारा लाखांचे साहित्य केले लंपास
सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर): जळगाव रस्त्यावरील अन्वी येथील शेत गट क्र. २२६ मधील आकाश ऍग्रो प्रोसेसिंग कंपनीत दिगविजय इंडस्ट्रिज कंपनीचा नव्याने बसवलेला १६५० के.व्ही.चा विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याची काँपर वायर (किंमत अंदाजे १०.५० लाख) आणि काँर्गोटाँप लँमेनेशन ५०० किलो (किंमत अंदाजे २ लाख) असा एकूण १२.५० लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ मार्च रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
या कंपनीत कामावर असलेले वॉचमन शंकर मुळे रात्री झोपेत असताना त्याला आवाज आल्याने तो उठला. मात्र, त्याच्या समोर तिघेजण चाकू घेऊन उभे होते. त्यांनी वॉचमनला धमकावले आणि चादर हटवू नकोस, अन्यथा तुझा जागेवरच खून करू, असे म्हणत त्याला गप्प बसण्यास भाग पाडले. चोरट्यांनी त्याचे हातपाय दोरीने बांधून मोबाईल काढून घेतला. त्यानंतर अंदाजे ८ ते १० चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा व अन्य साहित्य चोरले. जवळपास १५०० लिटर ऑइल जागेवरच ओतून दिले. चोरी झाल्यानंतर सकाळी ६ वाजता चोरटे एक कार व पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून पसार झाले.
गुन्हा करताना चोरट्यांनी कोणतेही पुरावे मागे राहू नयेत म्हणून वॉचमनचे हातपाय बांधण्यासाठी वापरलेली दोरी सुद्धा सोबत नेली. त्याचबरोबर त्याच्या दुचाकीच्या प्लगची वायर कापली, जेणेकरून तो लगेच कोणाला कळवू शकणार नाही. सकाळी ७ वाजता वॉचमनने जवळच्या हॉटेलवरून कंपनीचे मालक आकाश गौर यांना फोन करून माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. सकाळी ७.३० वाजता मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फिंगरप्रिंट एक्सपर्ट व डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले. मात्र, अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही. आकाश ऍग्रो कंपनीचे संचालक आकाशचंद्र गौरठाकुर (वय ५३, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.