२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 08:21 PM2023-02-20T20:21:36+5:302023-02-20T20:21:49+5:30
अजिंठा पोलिसांनी घेतला आयशर ताब्यात, आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ...
सिल्लोड : तालुक्यातील गोळेगाव येथून शनिवारी सुमारे ९५ क्विंटल कापसाने भरलेला चोरीस गेलेला ट्रक रविवारी मध्यरात्री १.३० वाजता कन्नड तालुक्यातील हतनुर टोलनाक्यावर मिळून आला. ट्रक सोडून पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान अजिंठा पोलिसांना पेलायचे आहे.
सिल्लोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विजय मराठे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, अली शेख,पोहेकॉ बाबा चव्हाण,रविंद्र बागुलकर यांनी सर्वत्र नका बंदी लावली होती सिल्लोड, पालोद, अजिंठा, भराडी, फुलंब्री, व जागो जागी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते. इतक्यात अजिंठा पोलिसांना तो चोरी गेलेला आयशर हतनूर जवळ आलेल्या टोल नाक्यावर उभा असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो आयशर ताब्यात घेतला.
चोरीचा आयशर पकडला गेला त्यातील कापूस असलेला मुद्देमाल मिळाला असला तरी अजून यातील चोरटे पसार आहे.त्या चोरट्याना पकडण्याचे जिकरीचे काम पोलिसांना करायचे आहे.ते चोरटे कोण ...त्यांनी हा आयशर चोरला खरा पण तो रस्त्यात सोडून ते का पसार झाले तो कापूस कुणाला विकला जाणार होता याचा शोध होणे महत्वाचे आहे.
सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्या मालकीचा विटकरी रंगाचा आयशर ट्रक (एमएच २१ बीएच ३०२४ ) शनिवारी गोळेगाव येथून चोरीला गेला होता. त्यात शेतकऱ्यांचा जवळपास ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ९५ क्विंटल कापूस होता. कापूस सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्रीसाठी नेत असताना चालकाने ट्रक औरंगाबाद जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर रात्री ८ वाजेच्या सुमारास उभा केला. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ट्रक पळवला. रविवारी सकाळी ही घटना समोर आली होती. त्यानंतर मालक तुकाराम दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ७ लाख ६६२०० रुपयाचा कापूस व १५ लाखाचा ट्रक असा एकूण २२ लाख ६६२०० रुपयाचा मुद्देमाल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तो ट्रक हतनूर टोलनाक्यावर आढळून आला.