मेडिकल दुकान फोडणारे चोरटे २४ तासाच्या आत गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:06 AM2021-09-05T04:06:02+5:302021-09-05T04:06:02+5:30
औरंगाबाद : समर्थनगर येथील धन्वंतरी मेडिकलच्या शटरचे कुलूप बनावट चावीच्या साहाय्याने उघडून चोरी करणारे दोन चोरटे २४ तासाच्या आत ...
औरंगाबाद : समर्थनगर येथील धन्वंतरी मेडिकलच्या शटरचे कुलूप बनावट चावीच्या साहाय्याने उघडून चोरी करणारे दोन चोरटे २४ तासाच्या आत गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहेत.
समर्थनगर येथील सावरकर चौक परिसरात असलेल्या धन्वंतरी मेडिकल दुकानाचे कुलूप गुरुवारी रात्री ९ ते शुक्रवारी ९ या वेळेत चोरट्यांनी उघडत ११ हजार ६०० रुपये किमतीचा माल आणि रोख पैसे चोरुन नेले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मेडिकल दुकान फाेडणाऱ्या आरोपींना शोधण्याचे आदेश उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या पथकाला दिले. यानुसार साेनटक्के यांना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी समर्थनगर येथील प्लॉट नंबर २१४ येथील घरात सापडले. या आरोपींमध्ये अमरनाथ खुलाशराव भुमे (१९, रा. प्लॉट नंबर २१५ एरंडे यांच्या घरात), पंकज सुरेश जाधव (१९, रा. नारळीबाग) या दोघांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ६ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार विठ्ठल जवखेडे, नाईक परभत म्हस्के, शिपाई लखन गायकवाड यांच्या पथकाने केली.